Friday, 3 June 2011
‘दिगंबर कामत गेट वेल सून’
माध्यमप्रश्नी युवकांचे फेसबूकद्वारे रणशिंग
पणजी, दि. २ (प्रतिनिधी)
‘पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा...’ या पंक्तीप्रमाणे मातृभाषेला दुय्यम स्थान देत इंग्रजीकरणाचा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध तरुणांनी रणशिंग फुंकले आहे. येत्या दि. ४ जून रोजी ‘दिगंबर कामत गेट वेल सून- युथ कन्व्हेनशन’ या नावाने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ३ वाजता जुन्ता हाउसच्या सहाव्या मजल्यावर स्वामी विवेकानंद सभागृहात ही परिषद होणार आहे. यावेळी गोव्यातील तरुणांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन ‘फेसबूक’वर करण्यात आले आहे. सध्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना हे ‘फेसबूक’ जड झाले आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री कामत यांनी केंद्रात एक पत्र लिहून तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या फेसबूकवर बंदी घालण्याचीही मागणी केली होती.
‘फेसबूक’ या सोशल नेटवर्कवर ‘दिगंबर कामत गेट वेल सून’ म्हणून जोरदार मोहीम चालवण्यात आहे. युगांक पुंडलिक नाईक या तरुणाने फेसबूकवर हा ‘ग्रुप’ सुरू केला असून त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत हजारो तरुण या ग्रुपशी जोडले गेले आहेत. तरुणांबरोबर साहित्य क्षेत्रातील दिग्गजांनीही दिगंबर कामत यांच्याविरुद्ध आग ओकण्यास सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी पथनाट्य करूनही या तरुणांच्या गटाने जागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. उद्या सकाळपासून पणजी शहरात गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य केले जाणार आहेत. सदर परिषदेला आतापर्यंत १३१ तरुणांनी उपस्थिती लावण्याचे जाहीर केले आहे. या दोन दिवसांत ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. गोव्यात शिक्षण घेतलेले आणि घेत असलेले, अशा तरुणांना एकत्र आणण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे युगांक यांनी स्पष्ट केले आहे.
दामोदर मावजो यांनीही ‘फेसबूक’वर मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात की, ‘काणकोणचो केलो घात, तातून कॉंग्रेशीचो हात. कोकणीचो विश्वासघात गोयकांरा तुका केन्नाच भोगशिचेनात’ या शब्दांनी त्यांनी आपला राग व्यक्त केला. आज (दि.२) दुपारी १२ वाजता सुमारे ३०० ते ३५० तरुणांनी ठरवून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मोबाईलवर ‘दिगंबर कामत गेट वेल सून’ म्हणून एसएमएस पाठवले आहेत. तरुणांच्या या ‘एसएमएस’चा वर्षाव पाहून तरी माध्यम प्रश्नात बदल होईल का...?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment