मनोहर पर्रीकर यांचा सनसनाटी आरोप
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): बाळ्ळी येथील जळीतकांडाच्या घटनेला सहा दिवस पूर्ण होऊनही अद्याप या घटनेचा पंचनामा करण्यात आलेला नाही. घटनास्थळावरून पुरावे जमविण्यासाठी किंवा फोरेन्सीक तज्ज्ञ पथक पाठवण्यासाठी पोलिस खात्याने कोणताच पुढाकार घेतला नाही. पोलिसांकडून सुरू असलेला हा वेळकाढूपणा म्हणजे पुरावे नष्ट करण्याचाच डाव असल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला.
बाळ्ळी येथील आदर्श सोसायटी व आंचल सोसायटीला लावण्यात आलेली आग हा पूर्वनियोजित कट होता, हे येथील परिस्थितीवरून स्पष्टपणे दिसून येते. आदर्श सोसायटीत भिंतींवर रक्ताचे डाग आहेत. याठिकाणी रक्ताळलेल्या व्यक्तीला ओढून नेल्याच्याही खुणा आहेत. या सर्व खुणांची फोरेन्सीक तज्ज्ञांकडून पाहणी व्हायला हवी होती. मृत व्यक्तीच्या रक्तगटाचा व इथे सापडलेल्या रक्तगटाची चाचणी होणे गरजेचे होते. तसेच हे रक्त अन्य कुणाचे आहे काय, याचाही तपास होणे गरजेचे होते. सोसायटीचे शटर तोडण्यासाठी वापरलेल्या लोखंडी सळ्या, दंडुके तसेच इतर साहित्यही ऐसपैस पसरले आहे. या जळीतकांडाची चौकशी करताना हे पुरावे महत्त्वाचे धागेदोरे ठरू शकले असते परंतु पोलिसांकडून अद्याप हे पुरावे गोळा करण्यासाठी काहीच केलेले दिसत नसल्याने या प्रकरणावर पांघरूण घालण्याचेच जोरदार प्रयत्न सरकार दरबारी सुरू असल्याची टीकाही पर्रीकर यांनी केली.
जी. पी. नाईक यांच्या मोबाईलची चौकशी हवी
दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांच्या मोबाईलवर २५ रोजी नोंद झालेल्या सर्व कॉल्सची माहिती उघड करा, अशी मागणी पर्रीकर यांनी केली आहे. ‘उटा’ आंदोलनाच्या दिवशी याठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या अधिकार्यांच्या मोबाईलवरील माहितीची चौकशी व्हायलाच हवी. ज्याअर्थी गरज नसताना लाठीहल्ल्याचे आदेश देण्यात आले त्याअर्थी कुणीतरी राजकीय स्तरावर हा आदेश दिला जाण्याची शक्यताही पर्रीकर यांनी वर्तविली. पोलिसांनी याठिकाणावरून फूस मारून समाज कंटकांना रान मोकळे करून दिले व तिथेच ‘उटा’आंदोलकांवर खुनी हल्ला करण्यात आला. आदर्श सोसायटीकडे जाणार्या रस्त्यावर अडथळे टाकून तिथे सरकारी यंत्रणा पोहोचू नये याचीही खबरदारी हल्लेखोरांनी घेतली होती. या प्रकरणांत पोलिसांचा हात प्रथमदर्शनी स्पष्ट होतो व त्यामुळे या जळीतकांडाला सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला.
Wednesday, 1 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment