Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 2 June, 2011

प्रसंगी सर्वच पदांचा राजीनामा

विष्णू वाघ व आमोणकरांकडून पुरस्कार परत

पणजी, दि. १ (सांस्कृतिक प्रतिनिधी)
आपण कॉंग्रेस पक्षात असूनही सरकारच्या माध्यमप्रश्‍नी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या नीच कृत्याला विरोध करत असून येत्या ७ जूनपर्यंत सरकारने सदर निर्णय न बदलल्यास आपल्याजवळ असलेल्या सर्व पदांचा आपण राजीनामा देणार आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी हिम्मत असेल तर गोमंतकीय जनतेच्या प्रक्षेाभाला सामोरे जाऊन दाखवावे असे प्रतिआव्हान देत साहित्यिक विष्णू सूर्या वाघ आणि नाट्यकलाकार व दिग्दर्शक देविदास आमोणकर यांनी आज (दि.१) कला आणि संस्कृती संचालनालयाच्या कार्यालयात साहाय्यक संचालक अशोक परब यांच्या उपस्थितीत युवा सृजन पुरस्कार परत केले. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारी अनुदान देण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी एक अराष्ट्रीय पायंडा पाडला असून शैक्षणिक माध्यमाप्रति गोवा सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ साहित्यिक विष्णू वाघ आणि श्री. आमोणकर यांनी सदर पुरस्कार परत केले. यावेळी पत्रकार तथा मातृभाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज संध्याकाळी ३ वाजता श्री. आमोणकर आणि श्री. वाघ यांनी युवा सृजन पुरस्कार मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रू.१०,०००चा धनादेश परत केला.
यावेळी श्री. वाघ यांनी, मातृभाषा आणि संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी गोमंतकातील सृजनशील कलाकार आणि साहित्यिक म्हणून आम्ही कदापि मागे हटणार नाही. मुख्यमंत्री कामत यांनी काल दिलेल्या ‘खुशाल पुरस्कार परत करा’ या आव्हानाचा स्वीकार करून ठरलेल्या वेळेत आम्ही पुरस्कार परत करत आहोत. असे प्रतिपादन केले.
श्री. वाघ पुढे म्हणाले की, कोकणी व मराठी या लोकभाषांच्या मुळावर घाव घालण्याचे महापाप मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कामत हे जसे मुख्यमंत्री आहेत तसेच कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री आहेत. भाषा हे संस्कृतीचेच वाहन आहे. भाषेशी द्रोह म्हणजेच संस्कृतीशी द्रोह असल्यामुळे दोन वर्षापूर्वी त्यांच्या हातातून मिळालेला हा पुरस्कार माझ्या घरी राहिल्यास तो मला श्री. कामत यांच्या संस्कृतीद्रोहाचे स्मरण करून देत राहील. त्यापेक्षा तो परत करणे स्वतंत्र गोमंतकातील एक स्वाभिमानी राष्ट्रवादी लेखक व कलाकार म्हणून मला अगत्याचे वाटते.
सरकारने हा निर्णय घेऊन एक आठवडा उलटून सर्वसामान्य जनतेमधून प्रक्षोभाचा उद्रेक झाला, तरी कामत यांच्यावर काडीचाही परिणाम झालेला नाही तर ते केलेल्या कृत्याचे समर्थन करीत आहेत. गोवा राज्याचा मुख्यमंत्री इतका संवेदनशून्य असावा याची आम्हांला खरोखरच लाज वाटते. आम्ही कलाकार असून समाजातील सर्जनशील घटक आहोत तथापि आम्ही लाचार, कणाहीन नाही. स्वभाषेच्या हितासाठी सरकारने दिलेले पुरस्कारच काय पण प्राणही ओवाळून टाकायची आमची तयारी आहे.भाषा आणि संस्कृतीद्रोही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलेले पुरस्कार गोमंतकातील तमाम स्वाभिमानी कलाकारांनी सरकारला परत करून सरकारचा निषेध करावा असे आवाहनही त्यांनी केले. तसेच कॉंग्रेस सदस्यत्वाचा आपल्याला विचार करावा लागेल असे श्री. वाघ यांनी जाहीर केले आहे.
श्री. आमोणकर यांनी यावेळी, सरकारच्या या बेजबाबदार निर्णयाने भविष्यातही आपली संस्कृती नष्ट करण्याचा घाट सरकारने घातलेला असल्याचे जाणवते. येत्या दहा वर्षानंतर येणार्‍या पिढीची नाळ संस्कृती टिकवणार्‍या कलांपासून सरकारच्या या निर्णयाने तोडली जाणार आहे. असा इशारा दिला. पुढे बोलताना श्री. आमोणकर म्हणाले की, असा घातक निर्णय घेऊन गोवा हे पूर्वेकडील रोम असल्याची उक्ती सार्थ ठरविली आहे. अशा या संस्कृतीनाशक सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते स्वीकारलेला हा पुरस्कार, सरकार जोपर्यंत हा निर्णय बदलून केवळ भारतीय भाषांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेत नाही तोवर या पुरस्काराला हात लावणे हे मी पाप समजतो. सरकारच्या इंग्रजी माध्यमाला अनुदान देण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून आपण हा पुरस्कार परत करत असल्याचे श्री. आमोणकर यांनी सांगितले.
यावेळी यावर्षीच्या युवा सृजन पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या राजदीप नाईक यांनी सरकारच्या निर्णयाविरोधी प्रतिक्रिया व्यक्त केली.

No comments: