Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 1 June, 2011

पुरस्कार खुशाल परत करा

मुख्यमंत्र्यांचे विष्णू वाघांना प्रतिआव्हान
पणजी, दि. ३१ (सांस्कृतिक प्रतिनिधी): ‘ज्यांना पुरस्कार परत करावेसे वाटतात त्यांनी ते खुशाल परत करावेत’ अशा शब्दांत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज विष्णू सुर्या वाघ, देविदास आमोणकर व कमलाकर म्हाळशी यांच्या धमकीला प्रत्युत्तर दिले. ‘या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण पुरस्कारप्राप्त मान्यवरांना बोलावले होते. परंतु बोलणी करण्यासाठी कुणीच पुढे आलेले नाही’ असे म्हणूनमुख्यमंत्र्यांनीआपल्या बाजूचे जाहीर समर्थन केले.
आज इथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी वरील विधान केले. इंग्रजी माध्यमाला मान्यता देण्याबाबतच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री दिगंबर कामत ठाम आहेत व त्यामुळेच भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या नावाने सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनी अजिबात महत्त्व न देण्याचाच पवित्रा घेतला आहे. मुळात कला व संस्कृती खात्याचे मंत्री म्हणून गेली कित्येक वर्षे काम पाहत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून एकीकडे कला व संस्कृतीच्या जतनासाठी कोट्यवधी रुपयांच्या विविध योजना व कार्यक्रम आयोजित केले जातात तर दुसरीकडे हेच मंत्री इंग्रजी माध्यमाला मान्यता देऊन संस्कृतीचाच गळा घोटत असल्याचा आरोप स्वाभिमानी कलाकारांनी केला आहे.
दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत पूर्णपणे इंग्रजी धार्जीण्यांच्या मोहपाशात अडकलेल्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय भाषा स्वाभिमान्यांच्या धमक्यांना अजिबात भीक घालायची नाही, असाच पवित्रा घेतला असून त्यामुळेच त्यांनी हे पुरस्कार खुशाल परत करावेत, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. दरम्यान, उद्या १ जून रोजी कला व संस्कृती खात्याकडे हे पुरस्कार परत करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

No comments: