पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): वाहतूक खात्याने नियमभंग करून साहाय्यक वाहतूक निरीक्षक भरती केल्याप्रकरणी वाहतूक खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर व संचालक अरुण देसाई यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश द्यावेत, असा अर्ज घेऊन तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली आहे. काशिनाथ शेटये व अन्य दोघांनी ही याचिका केली आहे. गेल्या महिन्यात याविषयीची तक्रार भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. परंतु, त्या तक्रारीवर या विभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याने अखेर तक्रारदारांनी न्यायालयात याचिका सादर केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
वाहतूक खात्याने साहाय्यक निरीक्षकपदाच्या १७ जागा जाहीर करून त्याठिकाणी ३२ जणांची भरती केली आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा करून दक्षता विभाग व भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत काही उमेदवारांचे गुणही वाढवण्यात आले आहे. तर काहींनी शेवटच्या तारखेनंतर अवजड वाहन चालवण्याचा परवाना काढला असल्याचाही दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे महत्त्वाचे असल्याचेही तक्रारदाराने आपल्या याचिकेत म्हटले आहे.
Saturday, 4 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment