Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 29 May, 2011

माध्यमप्रश्‍नी राष्ट्रवादीची दोन दिवसांत भूमिका

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी)
भाषा माध्यमप्रश्‍नी राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतलेल्या दुटप्पी धोरणावर पत्रकारांनी आक्षेप घेतल्यानंतर अखेर पक्षाच्या नवनियुक्त प्रभारी भारती चव्हाण यांनी दोन दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करेल, असे सांगितले. ‘उटा’ आंदोलकांच्या मागण्यांप्रति सहानुभूती दर्शवत त्यांच्या आंदोलनालाही राष्ट्रवादीने आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर भारती चव्हाणांच्या पत्रकार परिषदेचे आज पणजीत पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट, डॉ. कार्मो पेगादो, उपाध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो, सरचिटणीस ऍड. अविनाश भोसले, उपाध्यक्ष संगीता परब आदी हजर होते. बेकायदा खाणींना राष्ट्रवादीचा नेहमीच विरोध असेल, असे सांगतानाच पक्षाचे राष्ट्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या पोलिस चौकशीत अजिबात हस्तक्षेप करणार नाही, असेही यावेळी श्रीमती चव्हाण यांनी स्पष्ट केले. पक्षाला एकत्रित ठेवून संघटनेचा विस्तार करणे व पुढील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची ताकद जास्तीत जास्त मतदारसंघांत वाढवणे याकडे लक्ष देणार असल्याचेही त्या म्हणाल्या. उद्या २९ रोजी सकाळी १०.३० वाजता पक्षाची कार्यकारिणी बैठक होणार आहे; तसेच ४ जून रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी गाभा समितीची महत्त्वाची बैठक होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मी मराठीच्या बाजूने ः हळर्णकर
भाषा माध्यमप्रश्‍नी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयावेळी आपण आपले वैयक्तिक मत प्रकट केले व मराठी भाषेची बाजू घेतली, असे स्पष्टीकरण पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी केले. आपल्यासह बाबू आजगांवकर व मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनीही या निर्णयाला आक्षेप घेतला, असेही ते म्हणाले. हा निर्णय सर्वसंमतीने घेतल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत मात्र त्यांनी नकार न दर्शवता पत्रकारांनी काय तो अर्थ लावावा, असे सांगून आपली सुटका करून घेतली.

No comments: