पणजी आझाद मैदानावर
मारेकर्यांच्या अटकेची आणि जिल्हाधिकारी व पोलिसांच्या निलंबनाची मागणी
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)
न्यायालयीन चौकशी, मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांचा खून करणार्या मारेकर्यांना त्वरित अटक तसेच दोषी पोलिस अधिकारी आणि जिल्हाधिकार्यांना निलंबित करण्याची मागणी घेऊन उद्या (दि.३०) पणजीतील आझाद मैदानावर शेकडो लोक धरणे धरणार आहेत. दोषींवर कारवाई करण्यासाठी सरकारला दिलेली २४ तासांची मुदत संपुष्टात आली असून उद्या ठोस कृती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आझाद मैदानावर आंदोलनकर्त्या लोकांना भेट घेऊन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी जे. पी. नाईक यांना निलंबित करून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे आदेश देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप जिल्हाधिकार्यांना निलंबित केल्याचे आणि न्यायालयीन चौकशीचे कोणतेही आदेश सरकारने काढले नाहीत. त्यामुळे आंदोलक अधिक संतापले आहेत. मुख्यमंत्र्याच्या दुटप्पी धोरणामुळे वातावरण पुन्हा तंग बनत असल्याने पणजीतील आझाद मैदानावर आज सकाळपासूनच निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, ‘उटा’चे पदाधिकारी तथा पैंगिणचे आमदार रमेश तवडकर यांना मारहाण करून त्यांचा खून करण्याच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने या सदर गुन्हा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात नोंद केला आहे. दि. २७ रोजी आमदार तवडकर यांनी बाळ्ळी येथे आपण आंदोलनानंतर घरी जात असताना काही लोकांनी आपल्यावर हल्ला करून जिवंत मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्या यांच्याकडे केली होती. त्यानंतर ही तक्रार गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली होती. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक किंवा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले नाही. आपल्यावर हल्ला करणार्यांना समोर आणल्यास त्यांची आपण ओळख पटवू शकेन, असे श्री. तवडकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पुन्हा पंचनाम्याची मागणी...
मंगेश आणि दिलीप यांच्या कुटुंबीयांनी या दोघांचीही ओळख पटवलेली आहे. त्यामुळे त्या मृतदेहाचा पुन्हा पंचनामा करावा, अशी मागणी मयत तरुणांच्या नातेवाईकांनी केली आहे. तसेच, हा पंचनामा उपजिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत केला जावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांना बाराव्याचे निमंत्रण...
मंगेश आणि दिलीप यांना जाळताना त्याठिकाणी पोलिस हजर असल्याने या दोघा तरुणांच्या बाराव्याला या पोलिसांनीही उपस्थित रहावे, असे निमंत्रण फोंडा भागातील अनुसूचित जनजाती जमातीच्या तरुणांनी पोलिस महासंचालक, पोलिस उपमहानिरीक्षक व पोलिस प्रवक्ते आत्माराम देशपांडे यांना पाठवले आहे. तसेच, मृत व्यक्तीला अग्नी देताना त्याठिकाणी हजर असलेल्या सर्व लोकांना बाराव्याला बोलावून दारू पाजण्याची प्रथा आहे. त्यामुळे या बाराव्याला मुद्दामहून हजर राहावे, असेही या तरुणांनी या पत्रात म्हटले आहे. मंगेश आणि दिलीप यांचे सुतक फोंडा भागातील प्रत्येक अनुसूचित जनजातीच्या घरात पाळले जाणार आहे. तसेच, त्यांचे बारावे घातले जाणार असल्याचे या पत्रात स्पष्ट केले आहे. मात्र, या बाराव्याचे निमंत्रण पोलिस खात्याला पाठवल्याने हा चर्चेचा मुद्दा झाला आहे.
Monday, 30 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment