Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 11 May, 2011

माध्यमप्रश्‍नी १८ रोजी तोडगा?

उभय प्रतिनिधींना दिल्लीत घेऊन जाणार
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): प्राथमिक शिक्षणाच्या माध्यम प्रश्‍नावर तोडगा काढण्यात स्थानिक नेत्यांना अपयश आल्याने आता कॉंग्रेस पक्षाने दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींना घेऊन दिल्लीला कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १८ मे रोजी दिल्लीत एका खास बैठकीचे आयोजन करण्यात आले असून मानव संसाधन मंत्री कपील सिब्बल, अल्पसंख्याक मंत्री सलमान खुर्शीद, कॉंग्रेसचे केंद्रीय सचिव तथा राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांच्या उपस्थितीत या प्रश्‍नावर तोडगा काढला जाणार असल्याची माहिती आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कॉंग्रेस पक्ष माध्यम प्रश्‍न दिल्लीला नेऊन त्याचा राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका सुरू झाली आहे. गोव्याचे प्रभारी जगमितसिंग ब्रार यांनी काही दिवसांपूर्वीच येत्या २० मेपर्यंत माध्यम प्रश्‍नावर तोडगा काढला जाणार असल्याची घोषणा केली होती. परंतु, भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे ऍड. उदय भेंब्रे यांनी त्यावर जोरदार टीका करताना हा प्रश्‍न दिल्लीत सोडवला जाऊ शकत नाही, असा टोला हाणला होता. त्यामुळे दिल्लीतील या बैठकीला दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी उपस्थित राहतील की नाही, या विषयी शंका उपस्थित केली जात आहे.
या प्रकरणी इंग्रजी भाषेची मागणी करणार्‍यांना आणि राष्ट्रीय भाषेच्या पुरस्कर्त्यांना आम्ही दिल्लीला येण्याचे आवाहन करणार आहोत, असे यावेळी श्री. शिरोडकर म्हणाले. मात्र, त्या बैठकीला जाणार्‍या लोकांच्या विमान तिकिटांचा खर्च कॉंग्रेस उचलणार का, या प्रश्‍नावर मात्र त्यांनी मौैन पाळले. राज्याचे शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात यांना या बैठकीसाठी नेले जाणार आहे का, असा प्रश्‍न केला असता त्यांना नेण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे श्री. शिरोडकर म्हणाले.
कॉंग्रेसने दिशाभूल थांबवावी : वेलिंगकर
गोव्याचा माध्यम प्रश्‍न दिल्लीला नेऊन स्थानिक सरकारने आपली हतबलता सिद्ध केली आहे. आता दिल्लीत यावर योग्य तोडगा काढला जाईल असे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा चालवलेला प्रयत्न कॉंग्रेसने त्वरित थांबवावा, असा इशारा यावर प्रतिक्रिया देताना मंचाचे कृती योजना प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिला आहे. २० वर्षापूर्वी गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी आपल्या हिमतीवर याप्रश्‍नी निर्णय घेतला होता. प्राथमिक शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असावी, हा सिद्धांत जागतिक पातळीवरही मान्य झाला आहे. मात्र, आता कॉंग्रेस हा प्रश्‍न राजकीय पातळीवर नेऊ पाहत आहे. या प्रश्‍नाला जातीय रंग देण्याचा प्रयत्नही सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. माध्यम प्रश्‍नाशी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री सलमान खुर्शीद यांचा काय संबंध, असाही प्रश्‍न प्रा. वेलिंगकर यांनी उपस्थित केला. राज्य सरकारातील शिक्षणमंत्र्यांनीच हा प्रश्‍न उपस्थित केल्याने त्यांनी आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न जरूर करावा; परंतु, हे करताना दिल्लीकडे बोटे दाखवून लोकांची दिशाभूल करणे ताबडतोब थांबवावे असेही ते म्हणाले.

No comments: