Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 14 May 2011

बंगालात ममता, तामिळनाडूत जयललिता!

डाव्यांचा किल्ला ढासळला - करुणानिधी भुईसपाट
नवी दिल्ली, दि. १३ : पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या ३४ वर्षांपासून निर्विवादपणे सत्ता उपभोगत आलेली माकपप्रणित डावी आघाडी ममता बॅनर्जी यांच्या सुनामी लाटेत पार वाहून गेली. इकडे तामिळनाडूत जयललिता यांनी जोरदार मुसंडी मारत करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षाला घरी बसविले. पुदुचेरीत अद्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता काबीज केली. केरळात गेल्या १५ वर्षांपासून चालत आलेली माकपप्रणित डाव्या आघाडीची सत्ता मोडीत काढून कॉंगे्रसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने सत्ता पटकाविली. तर आसाममध्ये तरुण गोगोेईंनी सत्तेची ‘हॅट्ट्रिक’ पूर्ण केली.
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. केरळ वगळता सर्वच राज्यांमधील निकाल अपेक्षेनुसारच लागले. या निवडणुकीने तीन राज्यांमध्ये प्रस्थापितांना जोरदार झटका दिला आहे. इतकेच नव्हे तर; सत्तेच्या नशेत मनमानी करणार्‍यांना पराभवाचा स्वादही चाखवला आहे.
पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू या दोन राज्यांमधील निकालांकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते. आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर निवडणुकीचे कल जसजसे बाहेर येत होते, तसतशी सत्तेची दिशा स्पष्ट होत होती. मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही तासांतच पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी आणि तामिळनाडूत जयललिता यांच्या निवासस्थानी एकच जल्लोष सुरू झाला होता.
बंगालात डाव्यांची धुळधाण
२९४ सदस्यीय पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंगे्रसच्या नेतृत्वाखालील आघाडीने २२४ जागा मिळविल्या असल्या तरी, एकट्या तृणमूल मिळालेल्या जागांची संख्या १८३ असल्याने ममता बॅनर्जी यांनी स्वबळावरच पश्‍चिम बंगालमधील सत्ता खेचून आणली आहे. तृणमूल आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंगे्रसला ४१ जागा मिळाल्या असून, अन्य एक घटक पक्ष असलेल्या एसयुसीआयला भोपळाही ङ्गोडता आला नाही.
या राज्यात गेल्या ३४ वर्षांपासून सत्तेचे सुख भोगत आलेल्या माकपप्रणित डाव्या आघाडीला केवळ ६४ जागांवर समाधान मानावे लागले आहेत. यात सर्वाधिक ४१ जागा माकपला मिळाल्या असून, डाव्या आघाडीतील अन्य घटक पक्ष असलेल्या भाकपला ४, ङ्गॉरवर्ड ब्लॉकला १० आणि आरएसपीला ७ जागा मिळाल्या आहेत. इतर पक्ष व अपक्षांना केवळ सहा जागा मिळाल्या आहेत.
बुद्धदेव पराभूत
मावळते मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य हे स्वत: जादवपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक हरले. राज्याचे माजी मुख्य सचिव आणि तृणमूल कॉंगे्रसचे उमेदवार मनीष गुप्ता यांनी त्यांचा १६,७७७ मतांनी पराभव केला.
१८ मे रोजी शपथविधी
सध्या केंद्रात रेल्वे मंत्री असलेल्या ममता बॅनर्जी याच पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री होणार असून, त्या १८ मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तेचा आपला दावा सादर केला. राज्याला स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देण्यास आपले प्राधान्य राहील, जनतेवर आजपर्यंत जो अन्याय झाला तो दूर करण्यासाठी आपण सर्व ते प्रयत्न करू, असे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालानंतर सांगितले.
तामिळनाडूत अम्मांची लाट
तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी १९७ जागा जिंकून जयललिता यांच्या अद्रमुक आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. अम्मा म्हणून ओळखल्या जाणार्‍या जयललिता यांनी द्रमुकच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार हादरे दिले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या द्रमुकच्या वाट्याला केवळ ३५ जागा आल्या आहेत.
अद्रमुक आघाडीला मिळालेल्या १९७ जागांपैकी अद्रमुक पक्षाला १५२ जागा, डीएमपीकेला २७ आणि माकपला १० जागा मिळालेल्या आहेत. तर, तिथेच २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर तामिळनाडूत सत्तेवर येण्याच्या लालसेने आणि केंद्रातील सत्ता वाचविण्याच्या उद्देशाने द्रमुकशी युती करणार्‍या कॉंगे्रसला मोठा धक्का बसला आहे. द्रमुक आघाडीला मिळालेल्या एकूण ३५ पैकी द्रमुकला केवळ २३ जागा मिळाल्या असून, कॉंगे्रसला ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या आघाडीतील अन्य एक घटक असलेल्या पीएमकेला ३ जागा मिळाल्या आहेत.
जयललिता तिसर्‍यांदा होणार मुख्यमंत्री
जयललिता यांच्या पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले असल्याने राज्याच्या मुख्यमंत्रिपदी तिसर्‍यांदा विराजमान होण्यासाठी त्या सज्ज झालेल्या आहेत. आपल्या पक्षाने मित्र पक्षांसोबत निवडणूक लढविली असली तरी, सत्तेत आपण कोणत्याही मित्रपक्षाला स्थान देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुदुचेरीत कॉंगे्रसला धक्का
तामिळनाडूत द्रमुकला धक्का देणार्‍या जयललिता यांच्या अद्रमुकप्रणित आघाडीने पुदुचेरीत कॉंगे्रसला धक्का दिला आहे. ३० सदस्यीय पुदुचेरी विधानसभेत अद्रमुक आघाडीने २० जागांवर विजय मिळविला आहे. कॉंगे्रस आघाडी केवळ १० जागाच जिंकू शकली. अपक्ष व इतर पक्षांना भोपळाही ङ्गोडता आला नाही. कॉंगे्रसमधून अलीकडेच बाहेर पडलेले आणि स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी दोन्ही जागांवर विजय मिळविला आहे. तामिळनाडूप्रमाणेच येथेही कॉंगे्रस आणि द्रमुक यांनी युती केली होती. पण, जयललिता यांच्या अद्रमुक आघाडीने दोन्ही राज्यांत या युतीला धूळ चारली.
केरळातही डावे पराभूत
केरळात अतिशय अटीतटीच्या ठरलेल्या सत्ता संघर्षात कॉंगे्रसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने आज माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीचा पराभव करीत गेल्या तीन दशकांपासून चालत आलेल्या डाव्यांच्या सत्तेला सुरुंग लावला. १४० सदस्यीय विधानसभेत सत्ता प्राप्त करण्यासाठी ७१ जागांची आवश्यकता असताना कॉंगे्रस आघाडीने एक जागा जास्त मिळवून साधे बहुमत प्राप्त केले. डाव्या आघाडीला ६८ जागा मिळाल्या.
दरम्यान, डाव्या आघाडीचा पराभव झाला असला तरी, या आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला माकप ४५ जागांसह सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून राज्यात उदयास आलेला आहे. तिथेच, सत्तेवर आलेल्या संयुक्त लोकशाही आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला कॉंगे्रस ८२ जागा लढवूनही केवळ ३८ जागांवर विजय मिळवू शकली आहे.
माकपाचे ज्येष्ठ नेते आणि मावळते मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांनी सलग तिसर्‍यांदा आपल्या मालामपुझा या पारंपरिक मतदार संघातून २३ हजार मतांनी विजय प्राप्त केला आहे. त्यांच्या मावळत्या मंत्रिमंडळातील बहुतांश सदस्यही विजयी झाले आहेत.
तरुण गोगोई पुन्हा मुख्यमंत्री
विकास आणि शांतता या दोन आश्‍वासनांच्या लाटेवर स्वार झालेल्या कॉंगे्रसने आसाममध्ये आज सत्तेची ‘हॅट्ट्रिक’ केली. १२६ सदस्यीय विधानसभेत कॉंगे्रस आघाडीने ७६ जागा जिंकल्या आहेत. आसाम गण परिषदेला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले असून, भाजपने ६ जागांवर विजय प्राप्त केला आहे. गेल्या निवडणुकीत २४ जागा जिंकणार्‍या आसाम गण परिषदेला यावेळी केवळ १० जागाच मिळू शकल्या. तर, गेल्या निवडणुकीत दहा जागा जिंकणार्‍या भाजपला यावेळी केवळ सहा जागा मिळाल्या आहेत.
-----------------------------------------------------------------
ममता बॅनर्जी: हा मॉं, माटी, मानुष यांचा विजय आहे. मी उद्योगांच्या विरोधात नसल्याने औद्योगिक आणि कृषी दोन्ही क्षेत्रांना लाभदायक ठरणारे नवे धोरण तयार करणार.
जयललिता : हा विजय लोकांचा आणि लोकशाहीचा आहे. द्रमुकच्या भ्रष्ट राजवटीविरोधात जनतेने मतदानातून संताप व्यक्त केला. कायदा व सुव्यवस्था हे आपले प्रथम प्राधान्य राहणार.

No comments: