Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 11 May 2011

अण्णा हजारे शुक्रवारी गोव्यात संध्याकाळी आझाद मैदानावर सभा

किरण बेदी, अग्निवेश, केजरीवाल,
मनीष सिसोदिया यांचाही सहभाग

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): भ्रष्टाचार विरोधी चळवळीतील ज्येष्ठ नेते अण्णा हजारे यांचे १३ मे रोजीचे गोव्यातील आगमन निश्‍चित झाले असून त्यांच्या आगमनाच्या बातमीमुळे कार्यकर्त्यांमधील उत्साह द्विगुणित झाला आहे. अण्णांचे आगमन १३ रोजी दुपारी होणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पणजीतील आझाद मैदानावर त्यांची विराट सभा होणार आहे. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे कार्यकर्ते ऍड. सतीश सोनक यांनी ही माहिती दिली. पणजी व मडगाव येथे या आंदोलनाच्या सभाहोणार आहेत.
गोव्यातील १३ मे रोजी होणार्‍या पणजी येथील जाहीर सभेत भाग घेण्यासाठी अण्णांसोबत अरविंद केजरीवाल, स्वामी अग्निवेश, श्रीमती किरण बेदी व मनीष सिसोदिया हे नेतेही येणार आहेत. याच दिवशी सकाळी १०.३० वाजता मडगाव येथील रवींद्र भवन येथे होणार्‍या जाहीर सभेत स्वामी अग्निवेश, तसेच अरविंद केजरीवाल हे प्रमुख वक्ते असतील. दुपारी ३ वाजता नवेवाडे, वास्को येथील संतोषी मातेच्या मंदिरात होणार्‍या सभेत किरण बेदी व मनीष सिसोदिया हे भाग घेतील. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या मोहिमेअंतर्गत या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
जनलोकपाल विधेयकास पाठिंबा, गोव्यात तात्काळ लोकायुक्त नेमण्याची गरज आणि भ्रष्टाचारास कडाडून विरोध या मुद्द्यांवर सभांमध्ये सामान्यांचा आवाज बुलंद होणार आहे. या सभांना गोव्यातील विविध समाजसेवी संघटना, संस्था, कार्यकर्ते यांचा सक्रिय पाठिंबा आहे. ही चळवळ कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित नसून राष्ट्रीय प्रश्‍नांवर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दिलेले योगदान, असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी करावा व गोव्याला भ्रष्टाचारविरोधी चळवळीच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे आयोजकांनी आवाहनकेले आहे.

No comments: