Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 May, 2011

बगदाद कारागृहात संघर्ष, १८ ठार

बगदाद , दि. ८
गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये बगदादच्या चर्चमध्ये लोकांना ओलिस ठेवून गोळीबार करणार्‍या गुन्ह्यासाठी कैदेत असलेल्या अतिरेक्याने कोठडीतील चौकशीदरम्यान पोलिस अधिकार्‍याची बंदूक हिसकावून घेतली. त्यानंतर तिथे झालेल्या संघर्षात एका पोलिस अधिकार्‍यासह आठ पोलिस कर्मचारी व दहा कैद्यांचा मृत्यू झाला. या घटनेमागे इराकमध्ये अतिरेकी कारवाया वाढविण्याचा उद्देश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत महिलेची
आत्महत्या

मुंबई, दि. ८
घटस्ङ्गोट घेतल्यानंतर आपल्या प्रियकराशी लग्न करूनही आईकडे राहणार्‍या हुस्नजान मन्सारी या महिलेने मानसिक अस्वस्थतेतून विषारी पदार्थ घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. प्रियकर मोहम्मद मन्सारी व हुस्नजान लग्न करूनही बांद्रा या उपनगरातील नवपाडा भागात वेगवेगळे राहत होते. एकत्र राहण्याच्या हुस्नजान हिच्या मागणीला तिच्या नवर्‍याने गंभीरपणे न घेतल्यामुळे आलेल्या अस्वस्थतेतून तिने आत्महत्या केली.

मध्य प्रदेशात दोन
न्यायाधीश निलंबित

जबलपूर, दि. ८
मध्य प्रदेशातील दोन न्यायाधीशांना त्यांच्या बेकायदेशीर वर्तवणुकीबद्दल निलंबित करण्यात आले आहे. सिद्धी येथील विशेष न्यायाधीश ओ. पी. सुनारिया यांना बलात्कार प्रकरणातील आरोपीला सात वर्षांची कोठडीची शिक्षा न देता तीन महिन्यांची अल्पशी कोठडीची शिक्षा सुनावल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. सागर जिल्ह्यातील राहेलीचे न्यायाधीश एस. एस. परमार यांचे नाव गुन्हेगारांच्या यादीत असल्यामुळे त्यांना देखील निलंबित करण्यात आले आहे.

पाण्याची टाकी कोसळून
दोन मुलांचा मृत्यू

उदयपूर, दि. ८
येथील बडगाव भागात पाण्याची टाकी कोसळल्यामुळे दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. अंबामाता पोलिस स्थानक परिसरात उंचावर असलेली पाण्याची टाकी अचानक खाली आली व तिच्याखाली पाच जण गाडले गेले. यात दिपा व रॉबिन ही दोन मुले घटनास्थळी मरण पावली तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

No comments: