Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 10 May 2011

वेर्णातील अपघातात एक ठार, एक गंभीर

वास्को, दि. ९(प्रतिनिधी): कामावर रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी आज वेर्णा येथे मृत्यूने एका युवकावर घाला घातला. दुचाकीवर मागे बसून जात असताना वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर मागून मिनिबसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अनंत रवींद्र देवरे (२३) हा युवक ठार झाला तर कैलाशचंद्र राऊत (२५) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८.२०च्या सुमारास सदर अपघात घडला. काही दिवसापूर्वीच गोव्यात आलेला मूळ ओरिसा येथील अनंत हा युवक कैलाशचंद्र याच्याबरोबर त्याच्या दुचाकीवरून (क्रः जीए ०२ एल ४६९७) पहिल्याच दिवशी कामावर रुजू होण्यासाठी निघाला. ते वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर पोहोचले असता मागून येणार्‍या मिनिबस (क्रः जीए ०२ टी ४५१२)ने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात
कैलाश व अनंत रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित गोमेकॉत दाखल करण्यात आले. मात्र तिथे अनंतला मृत घोषित करण्यात आले. उपचार घेत असलेला कैलाश हा वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामगार पुरवणारा कंत्राटदार असून मयत अनंतला तो कामावर नेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून मिनिबस चालक धूळप्पा याच्याविरुद्ध भा.दं.सं. २७९, ३३७ व ३०४(ए) कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यास अटक केली व नंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

No comments: