Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 14 May 2011

बेकायदा रेती उपसा प्रकरण बड्या अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): तेरेखोल - केरी आणि मांडवी नदीतील रेतीचा बेकायदा उपसा केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश आज पेडणे सत्र न्यायालयाने देताच पेडणे पोलिसांनी पेडणे मामलेदारांसह कॅप्टन ऑफ पोर्टस्, खाण संचालनालय, मच्छीमार खाते, विज्ञान व तंत्रज्ञान खाते तसेच वाहतूक खात्याच्या संचालकांविरुद्ध भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. गेल्या चोेवीस तासांत खाण संचालनालय आणि वाहतूक खात्याच्या संचालकांवर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा हा दुसरा गुन्हा नोंद झाला आहे.
गेल्या २४ फेब्रुवारी २०११ रोजी तेरेखोल केरी येथे बेकायदा रेती उपसा केल्याच्या प्रकरणाची पेडणे पोलिस स्थानकात तक्रार सादर करण्यात आली होती. त्याची कोणतीही दखल पोलिसांनी घेतली नसल्याने न्यायालयात अर्ज केला असता आज न्यायालयाने दोषी अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. तसेच, २४ तासांत गुन्हा नोंदवून त्याची एक प्रत तक्रारदाराला देण्याची सूचना करीत येत्या पंधरा दिवसांत या प्रकरणाचा काय तपास केला याचा अहवालही न्यायालयात सादर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. पेडणे सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजयालक्ष्मी शिवोलकर यांनी हा निवाडा दिला.
सदर आदेशाची प्रत मिळताच म्हापसा उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सॅमी तावारीस यांनी त्वरित पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या गैरहजेरीत तक्रार नोंद करून घेतली. सीआरझेड नियमांचे उल्लंघन होऊन आणि सरकारी तिजोरीला करोडो रुपयांचा फटका बसूनही कोणत्याही यंत्रणेने त्याची दखल घेतली नसल्याचे या प्रकरणातून उघडकीस आले आहे.

No comments: