Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 10 May, 2011

अयोध्येत पुन्हा ‘जैसे थे’

हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
नवी दिल्ली, द. ९ : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेच्या त्रिभाजनाची मागणी कोणीच केली नसतानाही या जागेचे त्रिभाजन करण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश निराशा करणारा आणि आश्‍चर्यकारक असाच आहे, असा निर्वाळा देत, अयोध्येत १९९३ प्रमाणेच ‘जैसे थे’ स्थिती कायम राखण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. सोबतच, हायकोर्टाच्या गेल्या वर्षीच्या ३० सप्टेंबर रोजीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीही दिली.
न्यायमूर्ती आङ्गताब आलम आणि न्या. आर. एम. लोधा यांच्या खंडपीठाने, हायकोर्टाचा आदेश आश्‍चर्यकारक असून, काही प्रमाणात गोंधळ निर्माण करणाराही आहे, असे स्पष्ट करीत, या वादाशी संबंधित कोणत्याही पक्षकाराने मागणी केली नसतानाही हायकोर्टाने मात्र या जागेचे त्रिभाजन करून टाकले, यावर नाराजी व्यक्त केली.
त्या ६७ एकर जागेवर पुढील आदेशापर्यंत कुठलेही धार्मिक कार्य होणार नाही, असे निर्देश देतानाच १९९३ प्रमाणेच ‘जैसे थे’चे आदेश येथे पुन्हा एकदा कायम राखण्यात यावे, असा आदेश न्यायालयाने दिला. तथापि, या जागेत श्रीरामाचे जे तात्पुरते मंदिर आहे, तिथे हायकोर्टाच्या आदेशानुसार पूजा करण्याची परवानगी राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने गेल्या वर्षी ३० सप्टेंबर रोजी अयोध्येतील या जागेचे मुस्लिम, हिंदू आणि निर्मोही आखाडा यांच्यात तीन भागात विभाजन करण्याचे आदेश दिले होते.
या तिघांपैकी कोणीही जागेचे त्रिभाजन करण्याची मागणी केली नव्हती. तरी सुद्धा हायकोर्टाने स्वत:च्याच इच्छेने त्रिभाजनाचा अङ्गलातून आदेश दिला. हा आदेश गोंधळाची स्थिती निर्माण करणारा असल्याने तो कार्यान्वित करता येणे शक्य नाही. आम्ही यावर स्थगिती देत आहोत, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
हायकोर्टाच्या आदेशात आता अतिशय बिकट स्थिती निर्माण झालेली आहे. या जागेशी संबंधित तिन्ही पक्षकारांनी वादग्रस्त जागेच्या केवळ २.७७ एकर जागेसाठीच याचिका दाखल केली असली तरी, आम्ही संपूर्ण ६७ एकर जागेसाठी ‘जैसे थे’चे आदेश देत आहोत.
अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाला निर्मोही आखाडा, अखिल भारतीय हिंदू महासभा, जमात अलामा-ए-हिंद आणि सुन्नी वक्ङ्ग बोर्ड तसेच भगवान राम विराजमान आदी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हायकोर्टाचा निकाल केवळ श्रद्धेवर आधारित होता, पुराव्यांचा त्यात अभाव होता. त्यामुळे हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती या संघटनांनी केली होती.
--------------------------------------------------------
सर्व पक्षांकडून निकालाचे स्वागत
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेच्या त्रिभाजनाचा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अयोध्या वादाशी संबंधित सर्वच पक्षांनी स्वागत केले. न्यायालयाचा निकाल समाधानकारक असल्याचे या पक्षांनी म्हटले आहे.

No comments: