डिचोली, दि. ११ (प्रतिनिधी): सर्वण येथील टी. सी. क्र. २८/१९५३ मधील खाण कंपनीच्या व्यवस्थापनास या परिसरातील खाणीचे काम त्वरित थांबवावे, अशा आशयाची नोटीस गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली असून कलम २१ अंतर्गत कोणत्याही प्रकारचे काम हाती घेतल्यास कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.
सदर खाण कंपनीला या बाबतची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत व खाणीचा परवाना रद्द का करू नये यासंबंधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सदर नोटिशीनुसार, कंपनी व्यवस्थापनाने १ फेब्रुवारी २०११ रोजी सुनावणी ठेवण्याची मागणी केली होती. सदर मागणीला अनुसरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने ८ मार्च रोजी सुनावणी ठेवली होती. यावेळी खाण व्यवस्थापनाने सर्वण भागात कसल्याच प्रकारचे काम हाती घेण्यात आले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. परंतु, १४ मार्च २०११ रोजी रमेश गावस यांनी सदर भागात खाणीचे काम हाती घेण्यात आल्याची तक्रार मंडळाकडे नोंदविली होती. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच तिळारी धरण प्रकल्प अधिकार्यांनी एकत्रितपणे २३ मार्च २०११ रोजी सदर भागाची पाहणी केली असता त्या ठिकाणी पूल उभारणीसाठी कॉंक्रीट तयार करण्याचे काम करण्यात येत असल्याचे आढळून आले.
या भेटीवेळी कायद्याचे उल्लंघन करून खाण व्यवस्थापनाने बेकायदा काम चालू ठेवल्याचा ठपका ठेवून सदर खाणीचे काम त्वरित बंद करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. सदर कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर न दिल्यास कंपनीचे परवाने रद्द करण्यात येतील असेही बजावण्यात आले आहे.
Wednesday, 11 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment