७ जूनपर्यंत वरुणराजाचे आगमन
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): राज्यात उष्णतेचा पारा चढत चालला असून येत्या ३१ मे पर्यंत लोकांच्या जिवाची काहिली होणार आहे, असा अंदाज गोवा हवामान प्रयोगशाळेचे प्रमुख के. व्ही. सिंग यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दहा दिवसांत हा पारा ३४.८ अंशापर्यंत चढला असून तो अजूनही वर जाणार असल्याचे श्री. सिंग यांनी सांगितले. दरम्यान, सध्या तरी पावसाची कोणतीही लक्षणे दिसत नसून येत्या २० मे नंतरच मान्सूनचे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
गोव्याच्या काही भागांत उष्म्यामुळे लोक हैराण झाले आहेत. शहरी भागातील नागरिक शरीराला आराम पडावा म्हणून आइस्क्रीम पार्लर, कोल्डड्रिंक पार्लरचा आधार घेताना दिसत आहेत. पर्यटन हंगाम संपल्यातच जमा असल्याने समुद्रकिनार्यांवर आता पाण्यात डुंबण्यासाठी स्थानिक लोकांची गर्दी दिसू लागली आहे. लहान मुले व तरुणाई आपापल्या भागातील नद्यांत मनसोक्त जलविहार करताना दृष्टीस पडते आहे.
श्री. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २० मे पर्यंत अंदमान समुद्रात मान्सूनचे ढग एकत्र येणार आहे. त्यानंतर मान्सून केरळ किनारपट्टीत येतो. केरळ ते गोवा असा प्रवास करण्यासाठी मान्सूनला किमान सहा दिवसांचा कालावधी लागतो. दरम्यान, आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार ६ ते ७ जून पर्यंत मान्सूनचे गोव्यात आगमन होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र, ३१ मे पर्यंत मान्सूनपूर्व पाऊस सुरू होणार असल्याचेही ते म्हणाले. गेल्या वर्षी ३१ मे पर्यंत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले होते.
Wednesday, 11 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment