Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 9 May 2011

अंबिका सोनींची रवींद्र भवनास भेट

दर्जा उंचावण्याच्या प्रस्तावाचे सादरीकरण
मडगाव, दि. ८ (प्रतिनिधी)
केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री श्रीमती अंबिका सोनी यांनी आज येथील रवींद्र भवनाला आकस्मिक भेट दिली व यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (‘इफ्फी’साठी) या संकुलात साकारणार्‍या विविध सुविधांची माहिती करवून घेतली. त्यांचा कल पाहता यंदांच्या ‘इफ्फी’चा उद्घाटन वा समारोप सोहळा मठग्राम नगरीत होण्याची शक्यता बळावली आहे.
श्रीमती सोनी या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आज सकाळीच गोव्यात दाखल झाल्या. येथील व्यस्त मुक्कामातून वेळ काढून त्या मडगावी दाखल झाल्या व रवींद्र भवनात त्यांनी तासभर विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत गोवा मनोरंजन सोसायटीचे कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव व सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता श्री. रेगो होते.
रवींद्र भवनाच्या परिषदगृहात रेगो यांनी, या भवनाचा दर्जा उंचावण्यासाठी तयार केलेल्या योजनेचे त्यांच्यासमोर सादरीकरण केले. या योजनेनुसार रवींद्र भवनात दोन स्क्रीनची तरतूद केली जाईल. त्या प्रत्येक कक्षाची क्षमता २०० प्रेक्षक बसू शकतील इतकी असेल. तथापि, ते मल्टिफ्लेक्स नसेल. सार्‍या रवींद्र भवनाच्या परिसरात लँडस्केपिंग करून तो सुशोभित करण्याची तसेच तेथील प्रसाधनकक्ष आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याची तरतूदही या योजनेत आहे.
या भवनामागील मोकळ्या जागेचा ‘हॅपनिंग प्लाझा’ म्हणून विकास करण्याचा समावेशही त्यात आहे. जुन्या बाजारांतील कोलवा जंक्शन ते तरणतलावापर्यंतच्या परिसराचे लँडस्केपिंगव्दारा सौंदर्यीकरण केले जाणार आहे. या सर्व तरतुदींचे सादरीकरण पाहून श्रीमती सोनी यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी हा परिसर फिरून माहिती करवून घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकल्पावर २८ कोटी खर्च होतील. त्यापैकी तीन १० कोटी केवळ दोन स्क्रीनसाठीच्या कक्षांवरच खर्च होणार आहेत. हा सर्व निधी केंद्राकडून मिळणार आहे. त्यास मंजुरी मिळताच कामाला सुरुवात होईल. ऑक्टोबरपर्यंत ते काम पूर्ण केले जाईल अशी खात्री सूत्रांनी व्यक्त केली. या सुविधेनंतर रवींद्र भवनाची आसनक्षमता ११०० होणार आहे.

No comments: