Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 May, 2011

जितेंद्र देशप्रभूंविरोधात अजून ‘एफआयआर’ची नोंद नाही

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केंद्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांच्यावर अद्याप ‘एफआयआर’ची नोंद करण्यात आलेली नाही, अशी माहिती पेडणे पोलिसांनी दिली. बेकायदा खाण व्यवसाय केल्याप्रकरणी देशप्रभू यांच्यावर २४ तासांत ‘एफआयआर’ नोंद करण्याचा आदेश काल पेडणे प्रथमवर्ग न्यादंडाधिकार्‍यांनी दिला होता. तथापि, त्या आदेशाची प्रत हाती आली नसल्याचे उत्तर आज पेडणे पोलिसांनी दिले.
जितेंद्र देशप्रभू यांच्यासह खाण खात्यातील सरकारी अधिकारी तसेच, कॉंगे्रसच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मुलाविरोधात ही तक्रार नोंद होण्याची शक्यता आहे. देशप्रभू यांच्याबरोबर कॉंग्रेस नेत्याच्या त्या मुलानेही बेकायदा खनिज उत्खनन केले असा दावा करून काशिनाथ शेट्ये यांनी पेडणे पोलिस स्थानकात तक्रार सादर केली होती.
त्या तक्रारीची पेडणे पोलिसांनी कोणतेही दखल घेतली नसल्याने आता न्यायालयाने या तक्रारीची नोंद करून चौकशी सुरू करण्याचे आदेश दिलेे. त्यामुळे कॉंग्रेस नेत्याचा तो मुलगा कोण याबाबतची माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशप्रभू यांनी बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी त्यांना यापूर्वीच खाण खात्यामार्फत १.७२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ती रक्कम त्यांनी अजून सरकारजमा केलेली नाही. त्यामुळे सदर रक्कम वसूल करण्याचे आदेश पेडणे मामलेदारांना देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

No comments: