Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 11 May 2011

अखेर देशप्रभूंवर ‘एफआयआर’ नोंद!

अनेक अधिकारी गोत्यात येणार
कोरगाव बेकायदा खाण प्रकरण
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): कोरगाव पेडणे येथे सुमारे ५० कोटी रुपयांचे बेकायदा खनिज उत्खनन केल्याप्रकरणी अखेर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि फसवणुकीच्या कारणांवरून ‘एफआयआर’ नोंद करण्यात आला. त्याचप्रमाणे, खाण संचालक अरविंद लोलयेकर, वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सायमन डिसोझा, मुख्य वनपाल शशिकुमार, कोरगाव पंचायतीचे सरपंच व सचिवांच्या विरोधातही ‘एफआयआर’ नोंद करण्यात आला आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा २१७, २१८, ४०५, ४०९, ४२०, ४६८, १२०(ब) तसेच अन्य कायद्यानुसार हा ‘एफआयआर’ नोंदवण्यात आला आहे. हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आले असून याची चौकशी उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आज सकाळी ‘सीआयडी’ विभागाने ‘एफआयआर’ नोंद केल्याने या विविध खात्यांतील कर्मचार्‍यांचेही धाबे दणाणले आहेत. बेकायदा खनिज उत्खनन सुरू असताना वरीलपैकी एकाही खात्याच्या अधिकार्‍यांनी यावर कारवाई का केली नाही, याची उत्तरे या अधिकार्‍यांना द्यावी लागणार आहे. तसेच, त्यांच्यावर लावण्यात आलेली काही कलमे दखलपात्र असल्याने त्यांना अटकही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार खाण व वाहतूक खात्याच्या काही कर्मचार्‍यांनी वकिलांच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली आहे.
कोणतेही परवाने न घेता संशयित गुन्हेगार जितेंद्र देशप्रभू यांनी खनिज उत्खनन केले आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीला करोडो रुपयांचा फटका बसल्याचे या प्रकरणी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. कोरगाव येथील सर्वे क्रमांक २९९/० मध्ये हे उत्खनन करण्यात आले आहे. तसेच, खनिजाची बेकायदा वाहतूकही करण्यात आली आहे. काशिनाथ शेटये, प्रदीप काकोडकर आणि डॉ. केतन गोवेकर यांनी केलेल्या तक्रारीवरून वरील संशयितांवर ‘एफआयआर’ नोंद झाला आहे.

No comments: