Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 11 May 2011

मडकईकरांसाठी मुख्यमंत्र्यांची धडपड?

‘एचएसआरपी’ घोटाळ्याची फाईल पुन्हा ‘एजीं’कडे
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी (एचएसआरपी) कंत्राटात झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर तात्काळ ‘एफआयआर’ नोंदवण्याच्या कायदा खात्याने शिफारस केली होती. मात्र, हे घोडे पुन्हा एकदा अडले आहे. कायदा खात्याच्या शिफारशीची ‘फाईल’ मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांच्याकडे पाठवून तत्कालीन वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांची या प्रकरणांतून सहीसलामत सुटका करून घेण्यासाठी धडपड चालवल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
गत विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी ‘एचएसआरपी’ चा विषय उपस्थित करून सरकारला धारेवर धरल्यानंतर वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी कायदा खात्याचा सल्ला मागवून तात्काळ पुढील कारवाई करण्याचे आश्‍वासन सभागृहाला दिले होते. त्यानुसार ही फाईल कायदा खात्याकडे पाठवण्यात आली असता कायदा खात्याने चौकशी अहवालात नोंद झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी ‘एफआयआर’ नोंदवून चौकशी करण्याची शिफारस केली होती.
दरम्यान, सदर कंत्राट प्रकरणातील निविदा चिकित्सा समितीचे अध्यक्षपद हे खुद्द तत्कालीन वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याकडेच होते व त्यामुळे कायदा खात्याच्या शिफारशीवरून पोलिसांना श्री. मडकईकर यांच्याविरोधात ‘एफआयआर’ नोंदवणे भाग पडणार होते. कायदा खात्याच्या शिफारशीची ही ‘फाईल’ मुख्य सचिवांकडे पोहोचली असता त्यांनी ती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी पाठवली होती. श्री. मडकईकर यांनी मुख्यमंत्री कामत यांना आर्जव करून आपल्याला या प्रकरणातून सुटका करून घेण्याचा तगादा लावल्याने आता ही ‘फाईल’ ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी सुरू असलेल्या वेळकाढू धोरणाचा अंदाज घेता सरकार ‘एफआयआर’ नोंदवण्यास इच्छुक नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सरकार या प्रकरणी कारवाई करण्यास चालढकल करीत असेल तर आपण फौजदारी खटला दाखल करू, असा इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिल्याने आता या प्रकरणी श्री. मडकईकर आपली सुटका कशी काय करून घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
--------------------------------------------------------
‘फाईल’ मिळाल्यावर कारवाई करू : सुदिन
‘एचएसआरपी’ प्रकरणाची सदर ‘फाईल’ वाहतूक खात्याकडे आल्यानंतरच त्यात केलेल्या शिफारशीनुसार कारवाई करू, अशी माहिती वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ‘गोवादूत’शी बोलताना दिली. ही ‘फाईल’ सध्या ऍडव्होकेट जनरलांकडे सल्ल्यासाठी पाठवण्यात आल्याचे आपल्याला समजले असून त्यात नेमकी कोणती शिफारस करण्यात येते, यावरूनच पुढील कारवाईची दिशा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments: