पोलिस महासंचालकपदाचा ताबा स्वीकारला
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): गोव्यातील अमली पदार्थाचा प्रश्न केवळ पोलिस सोडवू शकत नाहीत. हे जाळे नष्ट करण्यासाठी गोव्यातील जनतेने बेधडक बाहेर येऊन पोलिसांना मदत करण्याचे आवाहन नवनियुक्त पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्य यांनी केले. भीमसेन बस्सी यांच्याकडून आज सायंकाळी ताबा स्वीकारल्यानंतर ते पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
‘‘गोवा ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे येथील बरेच प्रश्न मला ठाऊक आहेत. गोव्यात १९८४ मध्ये पणजीत एका उच्चभ्रू घरातील तरुण ड्रग्जच्या आहारी गेल्याचे उदाहरण आपण पाहिलेले आहे. त्यावेळी मी पणजी उपविभागीय पोलिस अधीक्षक होतो’’, अशी माहिती डॉ. आर्य यांनी यावेळी दिली.
राजकीय नेत्यांवर ‘एफआयआर’ नोंदवण्यास उशीर होतो. प्रत्येक वेळी गुन्हा नोंद करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहिली जाते, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, पोलिस फौजदारी कलम १५४ नुसार कोणत्याही तक्रारीवर गुन्हा नोंद केला पाहिजे, असे सांगून यापुढे ‘एफआयआर’ त्वरित नोंद केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव उपस्थित होते.
Wednesday, 11 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment