Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 11 May, 2011

मोपातील शेतकर्‍यांचा रुद्रावतार!

भूसंपादन अधिकार्‍यांना पिटाळले - पुन्हा पाय न ठेवण्याची तंबी
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): शेतकर्‍यांचा कडाडून होणारा विरोध डावलून मोपा येथील प्रस्तावित विमानतळासाठीच्या जमिनीतील झाडांवर क्रमांक घालण्यास आलेल्या भूसंपादन अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना आज दि. ११ रोजी येथील शेतकर्‍यांचा रुद्रावतार पाहावयास मिळाला. या अधिकार्‍यांना येथील शेतकर्‍यांनी घेराव घालून अक्षरशः पिटाळून लावले.
सविस्तर वृत्तानुसार, मोपा येथील प्रस्तावित विमानतळाला तेथील शेतकर्‍यांनी प्रखर विरोध केला आहे. मात्र, भूमिपुत्रांच्या विरोधाची दखल न घेता सरकार तेथे भूसंपादन करू पाहते आहे. याचाच एक भाग म्हणून आज दि. ११ रोजी मोपा विमानतळाचे भूसंपादन अधिकारी मनोहर वस्त यांच्या सूचनेवरून दोन अभियंते, एक वनखात्याचा शिपाई व सहा कर्मचारी मिळून नऊजण मोपात दाखल झाले व तेथील काजूच्या झाडांची साल काढून त्यावर रंगाने क्रमांक टाकू लागले. या प्रकाराची कुणकुण स्थानिक शेतकर्‍यांना लागताच अल्पावधीतच तेथे सुमारे ७० शेतकरी जमा झाले व त्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. कवडीमोल दराने येथील जमीन संपादित करून शेतकर्‍यांच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही; पुन्हा या ठिकाणी पाय ठेवाल तर खबरदार.. अशी तंबी यावेळी अधिकार्‍यांना देण्यात आली. लोकांनी धारण केलेला हा रुद्रावतार पाहून क्रमांक घालण्यासाठी आलेले अधिकारी गर्भगळीत झाले. गयावया करून त्यांनी संतप्त शेतकर्‍यांच्या तावडीतून सुटका करून घेतली व आपल्या वाहनांतून तेथून अक्षरशः काढता पाय घेतला.
दरम्यान, या प्रकाराबाबत मोपा अन्यायग्रस्त समितीचे सचिव संदीप कांबळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मोपात विमानतळ होणार आहे याची नोंद केंद्रात नाही की राज्यातही नाही. सरकारने सदर विमानतळ खाजगी कंपनी उभारणार आहे, असे निवेदन न्यायालयात केले आहे. हा सगळा बनाव असून येथील गरीब शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यात बॉक्साइट खाणी सुरू करण्याची योजना राज्यातील खाण माफियांनी आखली आहे. सत्ताधार्‍यांचे या खाण माफियांशी साटेलोटे असून जाफर ऍण्ड कंपनीला यासाठी तयार करण्यात आले आहे, असा आरोपही श्री. कांबळी यांनी केला.

No comments: