Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 8 May, 2011

लादेननंतरअमेरिकेचे लक्ष्य ‘आयएसआय’

निवडक अधिकार्‍यांना पकडणार

वॉशिंग्टन, दि. ७
पाकमध्ये घुसून कमांडो कारवाईत लादेनचा खातमा केल्यानंतर मारल्यानंतर आता अमेरिकेचे लक्ष्य आहे ते पाकिस्तानची ‘आयएसआय’ (इंटर सर्व्हिसेस इण्टेलिजन्स)ही गुप्तहेर संघटना. दहशतवाद्यांचा आधारस्तंभ असलेल्या आयएसआयच्या निवडक अधिकार्‍यांना पकडण्याची तयारी अमेरिकेने सुरू केली आहे.
आयएसआयची कोंडी केल्याशिवाय दहशतवादाला लगाम घालता येणार नाही याची पुरती जाणीव अमेरिकेला झाली आहे आणि त्यामुळेच अमेरिकेने पाकवरचा दबाव वाढवला आहे. लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेशी विशेष जवळीक राखून असलेल्या आयएसआय एजंटांची यादीच त्यासाठी अमेरिकेने तयार केली आहे. या अधिकार्‍यांना चौकशीसाठी ताब्यात देण्याची मागणीही अमेरिकेने पाकिस्तान सरकारकडे केली आहे. ही मागणी कळल्यापासून पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेला हव्या असलेल्या आयएसआयच्या अधिकार्‍यांमध्ये काही अतिशय वरिष्ठ पदावरचे अधिकारी आहेत. अशा अधिकार्‍यांना अमेरिकेच्या ताब्यात दिल्यास पाकिस्तानच्या बुरख्यामागील चेहरा सर्वांसमोर येणार आहे. त्यामुळे नामुष्की टाळण्यासाठी काय करावे, याबाबत पाकिस्तान सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
लादेन पाकिस्तानमध्येच मुक्काम ठोकून असल्याची माहिती पाकचे लष्करप्रमुख जनरल अश्ङ्गाक परवेझ कयानी आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल अहमद शुजा पाशा यांना होती. तो नेमका कुठे आणि कशा परिस्थितीत आहे यासंदर्भात त्यांना वेळोवेळी माहिती पुरवली जात होती. लादेनला आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी निवडक मंडळी कार्यरत होती. त्यांच्या बाबतही जनरल कयानी आणि लेफ्टनंट जनरल अहमद शुजा पाशा यांना माहीत होते. पण अमेरिकेपासून लपवून ठेवण्यासाठीच लादेनबाबत खोटी माहिती पसरवली जात होती, असे गुप्तहेरांनी केलेल्या तपासातून अमेरिकेला समजले आहे. ही माहिती मिळाल्यापासून अमेरिकेने आयएसआयला धडा शिकवण्याची तयारी सुरू केली आहे.

No comments: