जाहीर सभेत नेत्यांचे आवाहन
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): राजकारण्यांची बेईमानी ही स्वतःचा अपमान मानलात तरच तुम्हाला भ्रष्टाचाराची चीड येईल. गोव्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे येत्या २०१२ पर्यंत लोकायुक्त स्थापन करून घेण्यासाठी कंबर कसा आणि त्याला विरोध करणार्या पक्षाला व आमदाराला घरची वाट दाखवा, असा सूर ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलनाच्या नेत्यांनी व्यक्त केला.
आज आझाद मैदानावर भ्रष्टाचार विरोधी सभेत किरण बेदी, स्वामी अग्निवेश, मॅगसेसे पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारावर कडाडून कोरडे ओढले. यावेळी ऍड. सतीश सोनकही व्यासपीठावर उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यास्तव अण्णा हजारे हे मात्र या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत.
भ्रष्ट उमेदवाराला थारा नको: किरण बेदी
केंद्रात जनलोकपाल येणार तसेच गोव्यातही लोकायुक्त आलेच पाहिजे. त्याला लागणारा मसुदा तयार करण्याची जबाबदारी ही गोमंतकीयांची आहे. त्या कामाला आत्तापासूनच लागा. भ्रष्टाचाराला थारा देणार नाही अशाच उमेदवाराला मतदान करा. भ्रष्टाचार नसता तर अमेरिकेपेक्षा भारत अधिक शक्तिशाली झाला असता. पैसे नाहीत म्हणूनच गोव्यात एकच विद्यापीठ आहे. एकही ‘आयआयटी’ नाही, ‘आयआयएम’ नाही, असे किरण बेदी यावेळी म्हणाल्या. सामाजिक कार्य केल्याशिवाय राजकारणात येण्याची स्वप्ने तरुणांनी पाहू नयेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
जनलोकपाल वरदान ठरेल: केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात जनलोकपाल कसा असेल याची माहिती उपस्थितांना करून देताना हे एक वरदानच ठरणार असल्याचे मत नोंदवले. जनलोकपाल समितीवर असणारेच भ्रष्टाचारात अडकल्यास त्यांच्याविरुद्धही कठोर कारवाई करण्याची तरतूद या मसुद्यात आहे. सध्या भ्रष्टाचार करणार्या व्यक्तीला शिक्षा झाली तरी त्याच्याकडून लुटली गेलेली रक्कम वसूल करून घेतली जात नाही. परंतु, या कायद्याद्वारे ती रक्कम वसूल केली जाणार आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भ्रष्टाचार प्रकरणात अडकल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याची तरतूद या जनलोकपालमध्ये आहे तसेच, ‘सीबीआय’, ‘सीव्हीसी’, ‘एसीबी’ यांना जनलोकपालमध्ये विलीन करण्याचाही प्रस्तावही यात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
भारत मुक्त नाहीच: स्वामी अग्निवेश
पोर्तुगीज आणि ब्रिटिशांपासून स्वतंत्र मिळवण्यास जेवढा संघर्ष करावा लागला नाही तेवढा हिंदुस्थानाला भ्रष्टाचारी राजकारण्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी करावा लागत आहे, असे मत स्वामी अग्निवेश यांनी यावेळी व्यक्त केले. गोर्या कातडीच्या व्यक्तीला लांबून ओळखता येते. पण, बेईमान आणि भ्रष्ट व्यक्तीला ओळखणे कठीण आहे. भारत अजूनही त्यांच्यापासून मुक्त झालेला नाही, असे ते म्हणाले.
------------------------------------------------------
‘‘भ्रष्टाचारी लोकांना ओळखूनही त्यांचे काहीच वाकडे होत नाही, कारण त्या व्यक्तींचे राजकारण्यांशी घनिष्ठ संबंध असतात. दिगंबर आणि अवधूतचे साटेलोटे असल्यानेच बेकायदा हॉटेल पाडले जात नाही’’ - स्वामी अग्निवेश
Saturday, 14 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment