पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
आपल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीतील अनेकांची निवड झालेली आहे, योग्यवेळी त्यांची नावे उघड करू, असा गौप्यस्फोट आज बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी ‘गोवादूत’शी बोलताना केला.
आगामी विधानसभा निवडणुकीत आपण चाळीसही मतदारसंघांत उमेदवार उतरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हे उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असतील की आपल्या स्वतःच्या पक्षाचे यावर स्पष्टीकरण देण्याचे त्यांनी नाकारले. त्यामुळे नवा पक्ष स्थापन करण्याच्या घोषणेवर मिकी यांनी आता ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोझन डिमेलो यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला करीत ‘राजीनामे काय मागता, हिंमत असेल तर पक्षातून काढून टाका. आपण राजीनामा देण्यापेक्षा ते तुम्हांला सोपे होईल,’ असे प्रतिआव्हानबाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी दिले आहे. राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष आपल्याला सांगत नाही तोवर आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही पाशेको म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीला जोरदार चपराक बसली आहे.
माध्यमप्रश्न, नवा पक्ष काढण्याची घोषणा आणि पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा द्या, असे मिकी यांना सांगण्यात आले होते. त्यावर बोलताना मिकी यांनी पक्षाचे प्रवक्ते डिमेलो यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रतिहल्ला चढवला.
‘मी अजूनही राष्ट्रवादीच आहे. वेळ आल्यावर योग्य ती भूमिका घेईन. माझी भूमिका मी आताच उघड केल्यास ही माणसे माझ्यामागे नव्याने हात धुऊन लागतील.
आपण आमदारकी आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाद्यावा असा ठराव झालेला नाही. कोणी तो संमत केला असेल तर त्याची प्रत आपल्यापर्यंत पोचलेली नाही, असे मिकी यांनी स्पष्ट केले.
Monday, 9 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment