Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 May, 2011

चाळीसही मतदारसंघ लढविणार!

मिकी यांच्या घोषणेमुळे कॉंग्रेस पक्षात खळबळ
मडगाव, दि.८ (प्रतिनिधी)
आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व चाळीसही मतदारसंघांत आपले उमेदवार उभे करणार या आमदार मिकी पाशेको यांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी कॉंगे्रसबरोबरच सत्ताधारी कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. साहजिकच त्यांची ही घोषणा थट्टेवारी नेण्यासारखी नाही, अशी या नेत्यांची आपसात कुजबूज सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत बहुतेक पदाधिकार्‍यांनी मिकी यांच्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा दावा केला होता. तथापि, त्यास न जुमानता आगामी निवडणुकीत सर्व म्हणजे चाळीसही मतदारसंघांतून उमेदवार उभे करण्याची घोषणा करून मिकी यांनी राष्ट्रवादीसह कॉंग्रेसलाही गोंधळात टाकल्याचे मानले जात आहे.
आपण राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊ, पण आपणास हवी तेव्हा. त्यापूर्वी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एकदा भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घालण्याचा आपला विचार आहे हे त्यांचे निवेदन राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना आपण काडीचीही किंमत देत नसल्याचे निदर्शक ठरले आहे.
यापूर्वी नादिया तोरादो प्रकरणात सर्व शक्ती त्यांच्याविरोधात एकवटलेल्या होत्या. मात्र त्याची अजिबात पर्वा त्यांनी केली नाही. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिकी यांनी बेताळभाटीत स्वतःच्या चाहत्यांचा महामेळावा आयोजित करून त्यात सर्व मतदारसंघांतून उमेदवार उभे करण्याची गर्जना केली होती. तथापि, तेव्हा त्यांनी हे उमेदवार राष्ट्रवादीचे असतील असे म्हटले होते. मात्र कालच्या त्यांच्या घोषणेत पक्षाचा उल्लेख नाही व आपण हे उमेदवार उभे करणार असल्याचे म्हटले आहे. त्यावरून गोव्यात कॉंग्रेसला पर्याय उभा करण्यासाठी ज्या पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या आहेत, त्यांचा संबंध आता मिकी यांच्या या घोषणेशी जोडला जात आहे.
संपूर्ण गोव्यात व विशेषतः विशिष्ट वर्गातील मतदारांचे प्राबल्य असलेल्या सासष्टीत सध्या कॉंग्रेसविरोधी वातावरण आहे. त्या मतदारांना स्वतःकडे वळवण्याची ही युक्ती असावी, असा कयासही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मिकी यांना पैशाची अडचण नाही. तसेच राजकीय डावपेचातही ते हार जाणारे नाहीत. यापूर्वीच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या चर्चिल आलेमाव यांना बाणावलीत आसमान दाखवून मिकी यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे.
या बाबी पाहिल्या तर मिकी यांचा सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा पवित्रा सत्ताधारी कॉंग्रेसला निश्‍चितच मारक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. निवडणुकीची तारीख जवळ येईल त्यानुसार राजकीय शक्तींच्या ध्रुवीकरणास वेग येईल. कॉंग्रेसचा पाडाव करण्याच्या इराद्याने एकत्र आलेल्या मंडळींसोबत मिकी हे जागांबाबत समझोता करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर सासष्टींतील अनेक मतदारसंघांत नवी राजकीय समीकरणे उदयाला येतील, असे मानले जात आहेत.
काही राजकीय निरीक्षकांच्या मते मिकी हे राष्ट्रवादीतून जितक्या लवकर बाहेर पडून नवा पक्षाची स्थापना करतील तेवढ्या लवकर या हालचालींना वेग येईल. मिकी यांनी यापूर्वीच आपण स्वतः आगामी निवडणूक बाणावलीऐवजी नुवे या नव्या मतदारसंघातून लढविण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने त्यांनी तेथे तयारीही आरंभली आहे. कुठ्ठाळीत त्यांनी आपली दुसरी पत्नी व्हियोला यांच्या नावे तेथील लोकांना ईस्टरच्या शुभेच्छा देऊन आपला राजकीय पाया व्यापक करण्यास सुरुवात केली आहे. कुडतरी, बाणावली, मुरगाव, वेळ्ळी, नावेली हे तर त्यांच्या ‘हिटलिस्ट’वरील मतदारसंघ. तेथील त्यांच्या उमेदवारांची नावेही तयार आहेत. मडगाव व नावेलीत ते अन्य पक्षांशी समझोता करण्याची शक्यता आहे. तथापि, मिकी यांनी अजून आपले नेमके पत्ते खुले केलेले नसल्यामुळेे कॉंग्रेसमधील त्यांचे प्रतिस्पर्धी सध्या कमालीचे गोंधळले आहेत.

No comments: