Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 9 May 2011

श्रीलईराई मातेच्या जयघोषाने शिरगाव नगरी दुमदुमली...

-हजारो भाविकांची उपस्थिती
-आजपासून कौलोत्सव

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीचा जत्रोत्सव आज दि. ८ पासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरू झाला. आज दिवसभर या जत्रोत्सवात भाग घेऊन देवीच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी देवींच्या धोंडासह (व्रतस्थ भक्त) हजारो भाविकांच्या झुंडीच्या झुंडी शिरगावकडे येत होत्या. देवी लईराईचा जयजयकार करत, हातात देवीचे रंगीबेरंगी ‘बेत’ घेऊन आलेल्या हजारो धोंडामुळे शिरगाव, अस्नोडा व मये परिसराला एक वेगळेच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शिरगावाच्या पवित्र असा स्थळाला आज वार्षिक जत्रोत्सवामुळे व हजारो भक्तांच्या जथ्यामुळे भक्तांचा महापूर आला होता. एरवी खाणीमुळे लाल होणारे रस्ते आज भक्तांच्या पावलांच्या पायधुळीने लालेलाल झाले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत शिरगावात वाहनांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर अस्नोडा येथेच वाहने अडवण्यात आली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे अस्नोडा ते शिरगाव हे अंतर भक्तांना पायीच चालत जावे लागले. सकाळी ११ पासूनच भली मोठी रांग देवीच्या दर्शनासाठी लागली होती. शिरगाव ते अस्नोडा दरम्यान शेकडो दुकाने थाटण्यात आली आहेत. विद्युत रोषणाईमुळे संध्याकाळनंतर या परिसराला वेगळीच शोभा येत आहे. मध्यरात्री होमकुंड पेटवण्यात आले. मंगलमय वातावरणात साजरा होणार्‍या या जत्रोत्सवाचा आज पहिला व महत्त्वाचा दिवस होता. रात्री उशिरापर्यंत भक्तांची येण्याची प्रक्रिया सुरूच होती. पहाटे २.३० च्या सुमारास होमखंडातून पार जाऊन अग्निदिव्य केल्यानंतर धोंड आपला उपवास सोडणार आहेत. देवस्थान मंडळी व पोलिस जत्रोत्सव व्यवस्थित पार पडावा म्हणून अथक परिश्रम करताना दसत आहेत. रात्री उशिरापर्यंत बससेवा सुरु होती. त्यामुळे भाविकांची संख्या वाढत होती. उद्या दि. ९ पासून दि. १२ पर्यंत देवीचा कौलोत्सव साजरा होणार आहे.

No comments: