Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 11 May 2011

लईराईच्या कौलासाठी भाविकांची रीघ

आज शेवटचा दिवस
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): शिरगाव येथील श्री लईराई देवीचा कौलोत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी होत असून उद्या १२ मे हा कौल घेण्याचा शेवटचा दिवस आहे. देवीचा जत्रोत्सव ८ मे रोजी साजरा झाल्यानंतर सुरू झालेल्या या कौलोत्सवाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
जत्रेला होत असलेली मोठी गर्दी लक्षात घेऊन देवीचे अनेक भाविक त्यानंतर होणार्‍या कौलोत्सवाला येणे पसंत करतात. त्यामुळे दुसर्‍या दिवसापासून सुरू होणार्‍या कौलोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होते. शिरगावातील लोकांच्या घराघरांत फिरणार्‍या देवीच्या कलशाचे दर्शन तथा कौल घेण्यासाठी सध्या झुंबड उडत आहे. दरम्यान, उद्या १२ रोजी कौलोत्सवाचा अंतिम दिवस आहे. देवीचा कलश संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पुन्हा मंदिरात जाणार आहे. त्यामुळे आज ११ रोजी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी कौलोत्सवाच्या ठिकाणी गर्दी केली होती. गोवा तसेच गोव्याबाहेरून आलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे होमकुंडस्थळी वाहतुकीची कोंडी झाली होती.
मोगरीच्या माळा स्वस्त
दरवर्षी देवीच्या कौलासाठी लागणार्‍या मोगर्‍यांच्या कळ्यांच्या माळा दहा ते वीस रुपयापर्यंत विकल्या जातात. यंदा मात्र मोगरीच्या कळ्यांचे विपुल पीक आल्यामुळे या माळांचे दर बरेच खाली आले आहेत. कौलोत्सवस्थळी हा दर पाच ते दहा रुपये प्रतिमाळ एवढा होता.

No comments: