कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची ‘रोखठोक’ मते
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): आगामी विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट मिळणारच नाही, याची आपण खात्री देऊ शकत नसल्याचे प्रतिपादन आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी केले.
आज पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. शिरोडकरांना याविषयी प्रश्न केला असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. तिकीट देण्याचे काम केवळ आपण करीत नाही. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीट मिळणारच नाही, याची खात्री देणे आपल्याला शक्य नाही. अशा उमेदवारांना तिकीट मिळण्याचे प्रमाण मात्र नक्की कमी केले जाणार असल्याचेही ते पुढे म्हणाले. राजकीय नेत्यांकडे शिक्षणातील पदवी असणे गरजेचे नाही. कारण पदवी घेतलेली प्रत्येक व्यक्ती हुशार असेलच असे नाही, असेही मत श्री. शिरोडकर यांनी यावेळी व्यक्त केले. सध्या कॉंग्रेस पक्षातील अनेक पदाधिकार्यांवर आणि सरकारमधील मंत्र्यांवर अनेक प्रकारच्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झाले असल्याने त्यावर कोणतेही स्पष्ट भाष्य करण्याचे श्री. शिरोडकर यांनी टाळले. परंतु, यूथ कॉंग्रेसमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कोणत्याही तरुणाला सदस्य बनवू नका, असा स्पष्ट आदेश दिला असल्याचे मात्र ते यावेळी म्हणाले.
..तर वाघांवर कारवाई!
कॉंग्रेस पक्षात तिकीट मिळवण्यासाठी पैशांच्या बॅगांची गरज नाही, असे त्यांनी विष्णू वाघ यांनी काणकोण येथे केलेल्या विधानावर स्पष्टीकरण देताना सांगितले. श्री. वाघ यांनी नेमके काय विधान केले आहे याची माहिती आपल्याला अद्याप मिळालेली नाही. त्यांनी खरेच तसे विधान केले असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
Wednesday, 11 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment