Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 10 May, 2011

एफआयआर नोंदवण्यास विलंब का?

जितेंद्र देशप्रभू प्रकरणी आर्लेकरांचा सवाल
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): पेडणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी आदेश देऊनही पोलिसांकडून बेकायदा खाण प्रकरणी माजी आमदार जितेंद्र देशप्रभू तसेच अन्य सरकारी अधिकारी व कंत्राटदाराविरोधात ‘एफआयआर’ नोंदवण्यास चालढकलपणा का केला जातो आहे? यात कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, असे सवाल भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी उपस्थित केले. या सरकारला न्यायालयाचीही कदर नसल्याचेच या कृतीवरून स्पष्ट होते, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. आर्लेकर बोलत होते. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. सामान्य लोकांना बारीकसारीक गोष्टींसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतात. एखाद्या बेकायदा प्रकरणी पोलिसांकडून ‘एफआयआर’ नोंदवून घेण्यासही नकार दर्शवला जात असल्याने राज्यात अराजकच माजले आहे की काय, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, पेडणेचे आमदार दयानंद सोपटे यांनी या प्रकरणी चौकशी केली असता पेडणेचे पोलिस निरीक्षक रजेवर गेल्याची माहिती मिळाल्याचे श्री. आर्लेकर म्हणाले. या पोलिस स्थानकावरील अन्य पोलिस साहाय्यक निरीक्षक शिरगाव जत्रोत्सवासाठी गेले आहेत तर अन्य पोलिस साहाय्यक निरीक्षक मुख्यमंत्र्यांच्या लग्नाच्या बंदोबस्तासाठी गेल्याचीही माहिती मिळाल्याचे ते म्हणाले.
कोरगाव येथील बेकायदा खाण व्यवसायात माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू हे गुंतले आहेत. यापूर्वी खाण खात्याकडून त्यांना १.७२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे व या दंडाच्या वसुलीची माहितीही देण्यास सरकार राजी नाही. या बेकायदा खनिज वाहतुकीचे कंत्राट गृहमंत्र्यांच्या एका नातेवाइकाला देण्यात आल्याचीही चर्चा आहे. याच कारणामुळे पोलिसांकडून ‘एफआयआर’ नोंद करून घेण्यास नकार दर्शवला जातो आहे की काय, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला.
कोरगावात सुरू असलेली खाण बेकायदा असल्याचे सरकारने मान्य करूनही याठिकाणी खनिज उत्खनन सुरू आहे. या परिसरात खनिज व्यवसायाला लागणारी यंत्रसामग्रीही ठेवण्यात आल्याची माहिती असून ती ताबडतोब जप्त करण्याची मागणीही यावेळी श्री. आर्लेकर यांनी केली. श्री. देशप्रभू यांची कायद्यालाही न जुमानणारी ही प्रवृत्ती वरिष्ठ नेत्यांच्या कृपाशीर्वादाशिवाय असू शकत नाही, असेही श्री. आर्लेकर म्हणाले. हा एकूण प्रकार म्हणजे राज्यातील कायदा सुव्यवस्थेची झालेली दयनीय अवस्थाच दर्शवते, असा टोलाही यावेळी श्री. आर्लेकर यांनी हाणला.

No comments: