प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत भावपूर्ण सत्कार
काणकोण, दि. ८ (प्रतिनिधी)
माणसांतील माणुसकी जपतो तो गाव. शहरांत हे नाते असतेच असे नाही. रमेश तवडकर हा साधाभोळा आमदार आपुलकी जपणारा. नेकीने आणि निष्ठेने पक्षकार्य करणारा. त्यांनी राबवलेली आदर्श ग्राम संकल्पना गावागावांत जोपासली गेली पाहिजे. तसे झाले तर गोव्याचे अस्तिव अबाधित राहील, असे कौतुकोद्गार साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांनी आज येथे काढले.
आमदार रमेश तवडकर कार्यगौरव व अखिल गोवा सोहळा समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात श्री. वाघ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे, सत्कारमूर्ती रमेश तवडकर, सौ. सविता तवडकर, खास अतिथी खासदार श्रीपाद नाईक, आमदार विजय पै खोत, नगराध्यक्ष रत्नाकर धुरी, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र केरकर, स्वागताध्यक्ष दिलीप गायतोंडे, कार्यध्यक्ष कमलाकर म्हाळशी, समिती सचिव विशांत गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. आरंभी आरती ओवाळून मान्यवरांचे आगमन घोडेमोडणी पथकासह मंडपात झाले. नंतर जयराम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गानवृंदाने स्वागतगीत सादर केले.
दिलीप गायतोंडे यांनी आमदार तवडकर यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले आणि सर्वांनी त्यांच्या कामाचा आदर्श समोर ठेवावा, असे आवाहन केले. नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कमलाकर म्हाळशी यांनी प्रास्ताविक केले. गोविंद गावडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. पुष्पा अय्या, अश्मा पागी, कविंद्र फळदेसाई, संजय कोमरपंत, जयराम काळे यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले.
श्रीपाद नाईक यांनी गौरव पुस्तिकेचे प्रकाशन केले आणि रमेश तवडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रतिपादन केले. सामाजिक बांधीलकी जोपासताना त्यांनी केलेले कार्य अफलातून असल्याचे श्री. नाईक यांनी सांगताच मंडपात टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. नंतर श्री. प्रभुणे यांच्या हस्ते तवडकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, मानपत्र आणि गोव्याची पारंपरिक समई देऊन गौरवण्यात आले. यावेळी पुन्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. डॉ. पुष्पा अय्या यांनी सौ. तवडकर यांची खणानारळाने ओटी भरली. मानपत्राचे वाचन दीपक अमोणकर यांनी केले. याप्रसंगी आमदार पै खोत, नगराध्यक्ष धुरी यांची तवडकर यांचा गौरव करणारी भाषणे झाली.
सत्काराला उत्तर देताना आपण केवळ निमित्तमात्र आहोत, हा सत्कार माझ्या कार्यकर्त्यांचा, हितचिंतकांचा आणि तमाम मतदार बंधूभगिनींचा असल्याची कृतज्ञता तवडकर यांनी व्यक्त केली. गौरव सीडीचे प्रकाशन पै खोत यांच्या हस्ते झाले. प्रा. केरकर यांनी या भूमीचा विकास करणार्या तवडकर यांचा गौरव म्हणजे एक दुर्मीळ योग असल्याचे उद्गार काढले. काही मंडळी जरी गोव्याच्या भूमीचे लचके तोडायला निघाली असली तरी चांगल्या कामाची दखल समाजाकडून घेतली जाते व तवडकर हे याचे आदर्श उदाहरण असल्याचेही प्रा. केरकर यांनी आवर्जून सांगितले. विशांत गावकर यांनी आभार मानले व अनंत अग्नी यांनी सूत्रनिवेदन केले. या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
कॉंग्रेसची अवस्था ‘बॅगा द्या, तिकीट घ्या’
पैंगीणच्या मतदारांनी ‘काळ्या आई’ची मनःपूर्वक सेवा करणार्या म्हणजेच शेतीला महत्त्व देणार्या रमेश तवडकर यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्याची निवड केली हे कौतुकास्पद आहे. आपल्याला गोव्याचा होत असलेला विद्ध्वंस पाहवत नाही. त्यामुळे चांगल्या कामाची चाड असलेले प्रतिनिधी निवडण्याची गरज आहे. कॉंग्रेसमध्ये ‘बॅगा’ द्या व तिकीट घ्या असे ट्रेंड आला आहे. मात्र भाजपमध्ये अहवाल द्या आणि तिकीट घ्या, असे चित्र दिसून येते. ही चांगली बाब आहे. सध्या पैसेवालेच आमदार होऊ लागले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा दहा ते बारा घराण्यांत विभागली गेल्यास आश्चर्य वाटू नये, असे रोखठोक विचार विष्णू सूर्या वाघ यांनी बोलून दाखवले. त्यांना प्रेक्षकांतून जोरदार प्रतिसाद मिळाला.
Monday, 9 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment