डिझेल ३ रुपयांनी तर स्वयंपाकाचा गॅस ५० रुपयांनी महागला
नवी दिल्ली, दि. २४
गेल्या सात महिन्यांत सात वेळा इंधनाचे दर वाढवणार्या केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने महागाईच्या आगीत आता डिझेलचाही समावेश केला आहे. आज (शुक्रवारी) मध्यरात्रीपासून डिझेल प्रतिलिटर ३ रुपयांनी महागणार आहेत. तसेच स्वयंपाकाच्या गॅसचा दर तब्बल ५० रुपयांनी आणि केरोसिन प्रतिलिटर २ रुपयांनी वाढणार आहे. या दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता निर्माण झाली असून देशभरातील गृहिणींनी गॅसच्या दरवाढीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आज राजधानीत मंत्रिगटाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पेट्रोलची दरवाढ वारंवार झाली, पण जून २०१० पासून डिझेल, स्वयंपाकाचा गॅस या सामान्यांशी संबंधित इंधनाची दरवाढ टाळण्यात येत होती. विधानसभेच्या निवडणुका असल्यानेच हा निर्णय घेण्याची हिंमत सरकार दाखवत नव्हते. मात्र तेल कंपन्यांनी दरवाढीचे टुमणे मागे लावल्यामुळे अखेर सरकारला हा निर्णय आज घ्यावा लागला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल सतत महाग होत असल्याने पेट्रोलियम कंपन्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात या तेल कंपन्यांना साधारणतः दीड लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा तोटा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी इंधनदरवाढीशिवाय केंद्राला पर्याय नसल्याचे पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी सांगितले.
सध्या महागाईचा दर नऊ टक्क्यांवर गेला. त्यात इंधनदरवाढ करणे हा आगीत तेल ओतल्याचाच प्रकार आहे. त्यामुळेच त्याचा कमीतकमी ङ्गटका सर्वसामान्यांना बसावा , यासाठी कच्च्या तेलावरील आयात कर काढून टाकण्याचा तर, डिझेलवरील हा कर २.५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. तरीही दरवाढ हा अटळ पर्याय होता, असे पेट्रोलियम मंत्रालयाचे म्हणणे पडले.
खरे तर हा निर्णय कालच होणार होता. मात्र अनेक मंत्री परदेशवारीवर असल्याने ती बैठक आज झाली. गेल्याच महिन्यात झालेल्या तब्बल पाच रुपयांच्या पेट्रोल दरवाढीचा बोजा झेलणार्या जनतेचे या दरवाढीने कंबरडेच मोडणार आहे.
फक्त पन्नास रुपये..
पेट्रोलियममंत्री एस. जयपाल रेड्डी यांनी या दरवाढीची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रपरिषदेत स्वयंपाकाच्या गॅसचा दर आम्ही ‘फक्त’ ५० रुपयांनी वाढवत आहोत, असे सांगून सामान्य जनतेच्या जखमांवर जणू मिठच ओतले.
Saturday, 25 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment