पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)
ढवळी - फोंडा येथील श्री शांतादुर्गा सेवा समितीच्या प्राथमिक शाळेत शिकणार्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी प्राथमिक स्तरावरील शालेय माध्यम म्हणून एकमुखाने मराठी भाषेचीच निवड केली आहे.
शाळेच्या पालक - शिक्षक संघाची सभा आज संध्याकाळी शाळेच्या आवारात पार पडली. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विवेक पेंडसे यांनी शिक्षण खात्यामार्फत पाठवण्यात आलेल्या माध्यमविषयक परिपत्रकाची माहिती पालकांना दिली व आपापल्या पसंतीचे माध्यम निवडअर्जात नमूद करण्याची सूचना केली. त्यानुसार, उपस्थित सर्व पालकांनी मराठीलाच आपली पसंती दिली. एवढेच नव्हे तर, शिक्षण खात्याने पाठवलेले इंग्रजीतील नमुना अर्ज बाहेर ठेऊन शाळा व्यवस्थापनाने तयार केलेल्या मराठी अर्जांचाच वापर केला.
भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे विष्णू वाघ यांनी पालकांना शालेय माध्यमाविषयी सविस्तर माहिती दिली. वाघ यांची दोन्ही मुले याच शाळेत शिकतात. यावेळी निवृत्त शिक्षक व गोमंतक मराठी भाषा परिषदेचे माजी अध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांनीही मार्गदर्शन केले.
दरम्यान, सत्तरीतील अनेक सरकारी प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठी भाषेलाच शंभर टक्के पसंती मिळाल्याची खबर आहे.
Thursday, 23 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment