पोलिस तक्रार करणार : प्रशांत नाईक
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): डायोसेशन सोसायटीच्या कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये जी मुले शिकत आहेत त्या मुलांवर व त्यांच्या पालकावर दडपण आणून ‘इंग्रजी माध्यम हवे’, असेच लिहून द्या; नपेक्षा शाळा सोडा, असा दबाव टाकण्यात येत असून अशा शाळांच्या व्यवस्थापनाविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली आहे.
या संदर्भात बोलताना प्रशांत नाईक म्हणाले की, राज्यातील सर्व शाळांना एक इंग्रजी भाषेत पत्रक पाठवले असून त्यावर पालकांनी आपणास कुठले माध्यम हवे ते लिहून देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या पत्रकात जास्तीत जास्त पालकांनी इंग्रजीच्या बाजूने कौल द्यावा म्हणून चर्चच्या अखत्यारीतील शाळा पालकांवर जोरदार दबाव आणत आहेत. काही ठिकाणी तर ‘इंग्रजी माध्यम हवे म्हणून लिहून द्या किंवा शाळा सोडा’ अशी सरळसरळ आदेशवजा धमकीच देण्यात येत असून पालकांकडून जबरदस्तीने इंग्रजी माध्यमाला संमती मिळवण्यात येत आहे. या संमतीचा वापर ‘गोव्यात जास्तीत जास्त पालकांना इंग्रजी माध्यम हवे’ असा प्रचार करून सरकारने लादलेले इंग्रजी माध्यम चालू ठेवण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे, अशी भीती श्री. नाईक यांनी व्यक्त केली आहे.
पालकांनी मातृभाषाच निवडावी
सरकारने माध्यम निवडीचे जे पत्रक पाठवले आहे ते स्थानिक भाषेत उपलब्ध व्हावे, अशी मागणी प्रशांत नाईक यांनी केली असून पालकांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता कोकणी वा मराठी या स्थानिक भाषेतूनच प्राथमिक शिक्षण मिळावे असे लिहून द्यावे, असे आवाहन केले आहे. तसेच वरील शाळांत पहिलीपासून कोकणी शिकलेल्या विद्यार्थ्यांना यापुढील वर्गात इंग्रजी शिकावे लागणार असून त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे हा धोकाही त्यांनी बोलून दाखवला आहे.
Tuesday, 21 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment