मळा तलाव सौंदर्यीकरण,बाजार प्रकल्पात भ्रष्टाचार
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): पणजीतील मळा तलावाचे सौंदर्यीकरण व मळा बाजार प्रकल्पाच्या नावाने सुमारे ४४,५०० चौरस मीटर जागा वार्षिक फक्त १ रुपया प्रतिचौरस मीटर भाडेदराने ‘मेसर्स कनका इन्फ्राटेक लि.’ कंपनीला ‘पीपीपी’ पद्धतीवर देण्याच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय गोवा पीपल्स फोरमने केला आहे.
गोवा पीपल्स फोरमचे निमंत्रक ऍड. सतीश सोनक यांनी या संबंधी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात हा आरोप केला आहे. उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणातर्फे अलीकडेच या संबंधीचा करार सदर कंपनीकडे करण्यात आला आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या ‘पीपीपी’ मार्गदर्शक तत्त्वांनुसार झालेल्या या व्यवहाराबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ६० वर्षांसाठी वार्षिक १ रुपया भाड्याने ४४,५०० चौरस मीटर जागा देणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हा संपूर्ण व्यवहार कोणत्या निकषांवर आधारित आहे याचा खुलासा राज्य सरकारने ताबडतोब करावा, असे आवाहन फोरमने केले आहे.
या संपूर्ण व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत असल्याने जनतेच्या मनातील संशय दूर करण्यासाठी ‘एनजीपीडीए’चे अध्यक्ष, महापौर, पणजीचे आमदार व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी या पत्रकांत म्हटले आहे.
Friday, 24 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment