Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 22 June 2011

माध्यमनिवड अर्ज मातृभाषेतूनच द्या!

भारतीय भाषा सुरक्षा मंचाची
प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

म्हापसा, दि. २१ (प्रतिनिधी) : गोव्यातील प्राथमिक शाळांत माध्यम बदल विषयीचे अर्ज इंग्रजीत पाठवले आहेत. राज्यातील प्राथमिक शाळांतील पालकवर्ग हा ग्रामीण भागांतील आहे. त्यामुळे इंग्रजीतून देण्यात आलेले अर्ज त्यांना समजणे कठीण होत आहे. गोव्याची प्रादेशिक भाषा मराठी आणि कोकणी असल्याने हे अर्ज याच भाषांतून देण्यात यावेत. तसेच, पालकांना इंग्रजीतून दिलेले माध्यम निवडण्यासाठीचे अर्ज देण्यासंबंधी राबवत असलेली प्रक्रियाही त्वरित रद्द करावी, अशी मागणी आज भारतीय भाषा सुरक्षा मंचाने केली.
मंचाच्या पदाधिकार्‍यांनी यासंदर्भात आज उत्तर गोवा शिक्षण विभागाच्या म्हापसा येथील कार्यालयात साहाय्यक भागशिक्षणाधिकारी (एडीईआय) जेकोब वर्जित यांची भेट घेतली व या विषयीचे निवेदन सादर केले. या निवेदनावर २३ जूनपूर्वी कार्यवाही व्हावी; अन्यथा मंच स्वतःच निर्णय घेईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी मंचाचे समन्वयक तुषार टोपले, शिवसेनेचे रमेश नाईक, वल्लभ केळकर, जयेश थळी, राजू तेली, श्रीपाद येंडे, हनुमंत वारंग, दिलीप गावडे, श्रीकांत पार्सेकर, कॅप्टन दत्ताराम सावंत, एकनाथ म्हापसेकर, सौ. शकुंतला नाईक, शोभा मेमन, क्रांती कोरगांवकर, रेषा नार्वेकर, अनिल सुतार, अभय सामंत, हेमंत, विजय तिनईकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भागशिक्षणाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आपण राजभाषेचा मान राखायला हवा होता. असे न करता आपण पुन्हा इंग्रजी भाषा सर्वांवर लादू पाहत आहात. विशेषतः आपल्या पाल्यांचे माध्यम निवडणे या महत्त्वाच्या विषयी आपण सर्व स्तरांतील लोकांना विश्‍वासात घेऊन लोकशाही पद्धतीने धोरण ठरवून मगच ते राबवायला हवे होते. मात्र, आपण घाईघाईत केलेली कृती निषेधार्ह आहे.
राज्यातील काही शाळांत इंग्रजीतून दिलेला अर्ज पालकांना समजत नसल्यास त्यांच्याकडून कोर्‍या अर्जावरच स्वाक्षरी किंवा अंगठा उठवून घेतला जातो. अशा अर्जांत नंतर इंग्रजी भाषेचीच निवड केली जाण्याची शक्यता आहे. काही शाळांत पालकांनी कोकणी वा मराठी माध्यम निवडल्यास तो अर्ज स्वीकारला जात नाही. तो परत करून नवा अर्ज पुरवला जातो, अशाही तक्रारी मंचाकडे आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आपण एक प्रकारे माध्यमप्रश्‍नी मतदान घेत आहात. एवढी मोठी प्रक्रिया राबवताना त्यात पारदर्शकता असणे गरजेचे होते. मतदान घेणारा तटस्थ असावा लागतो. मात्र, आज शासन इंग्रजीच्या बाजूने झुकले असताना असे मतदान शासन कसे घेऊ शकते, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने ही प्रक्रिया त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी मंचाने केली आहे.
-------------------------------------------------------------
पणजीत उद्या धरणे
भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून तिसवाडी व पणजी शाखेतर्फे गुरुवार दि. २३ रोजी सकाळी ९ ते संध्या. ५ या दरम्यान पणजी येथील आझाद मैदानावर धरणे आयोजित करण्यात आले आहे. या धरण्यात तिसवाडीतील सर्व मातृभाषाप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंचाचे तिसवाडी शाखा अध्यक्ष रामराव वाघ व पणजी शाखा अध्यक्ष सूरज कांदे यांनी केले आहे.

No comments: