Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 21 June, 2011

भारतीय भाषा सुरक्षा मंचाचा कार्यक्रम जाहीर

दुटप्पी मंत्र्यांवर धडक!
सत्ताधारी आमदार आणि सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): सभापती प्रतापसिंह राणे, आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे, पर्यटन मंत्री नीळकंठ हळर्णकर व वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी माध्यम प्रश्‍नावर गुळमुळीत आणि दुटप्पी भूमिका घेऊन गोमंतकीयांच्या विश्‍वासाला तडा दिला आहे. या मंत्र्यांच्या मतदारसंघांत धडक देऊन त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्याची पुढील रणनीती भारतीय भाषा सुरक्षा मंचाने आखली आहे. तसेच, उद्यापासून सत्ताधारी पक्षातील आमदार आणि सरकारी अनुदान घेऊन आयोजित केल्या जाणार्‍या प्रत्येक कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी अनुदान घेऊन कार्यक्रम आयोजित केलेल्या आयोजकांनी या निर्णयाची दखल घ्यावी, असे आवाहन मंचाच्या केंद्रीय बैठकीनंतर आज करण्यात आले. या विषयीची घोषणा मंचाच्या अध्यक्ष शशिकला काकोडकर यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रा. सुभाष वेलिंगकर, ऍड. उदय भेंब्रे, पुंडलीक नाईक, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, प्रा. अनिल सामंत, फा. आताईद माऊजिओ व एन. शिवदास उपस्थित होते.
घातकी मंत्र्यांना पाडा : वेलिंगकर
इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सरकारला देण्यात आलेली १८ जूनची अंतिम मुदत संपली असून आता लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार मंचाच्या आजच्या बैठकीत करण्यात आला. प्राथमिक स्तरावर इंग्रजीला अनुदान देण्यास ज्या ज्या मंत्र्यांनी साथ दिली आहे त्यांनी त्वरित मंत्रिपदाचे राजीनामे द्यावेत; अन्यथा या विश्‍वासघातकी आणि मातृभाषेच्या मारेकर्‍यांना जनतेने येत्या निवडणुकीत परास्त करावे, असे आवाहन प्रा. वेलिंगकर यांनी यावेळी केले. येत्या आठवडाभरात या सर्व दुटप्पी मंत्र्यांच्या मतदारसंघांत धडक मोर्चा, निषेध धरणे आणि जाहीर सभांचे आयोजन केले जाणार आहे. २३ जून ते २६ जुलैपर्यंतच हा कार्यक्रम चालणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. १८ जूनच्या क्रांतिदिनाला पणजीत आणि मडगावमध्ये गोमंतकीयांनी तरुणांनी एक झलक सादर केली आहे. यापुढे मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग रस्त्यावर उतरणार आहे. भजनी मंडळ, नाट्य कलाकारही यात सहभागी होणार आहेत, असेही वेलिंगकर म्हणाले.
‘अंडरटेकिंग’ ही फसवणूक : काकोडकर
पाल्याचे माध्यम निवडण्यास ‘पालकांना उघड पर्याय’च्या नावाखाली ‘अंडरटेकिंग’द्वारे पालकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी श्रीमती. काकोडकर यांनी केली. पालकांची दिशाभूल करून आणि प्रसंगी त्यांच्यावर जबरदस्ती करून हे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. पालकांच्या या विषयीच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यास भाग शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षणाधिकारी असमर्थ ठरल्यास त्याची पूर्ण जबाबदारी या अधिकार्‍यांची असेल, असा इशाराही श्रीमती काकोडकर यांनी दिला.
सरकारी अनुदान आणि जाहिराती घेऊन आयोजित केल्या जाणार्‍या प्रत्येक कार्यक्रमावर बहिष्कार घातला जाईल; भाषेसाठी कलाकार वर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेला असताना दुसर्‍या बाजूने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे योग्य ठरणार नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे साहित्यिक पुंडलीक नाईक यांनी स्पष्ट केले.
सरकारने हटवावे : एन. शिवदास
दरम्यान, सरकारने इंग्रजीला अनुदान दिल्यास कोकणी अकादमीच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याच्या घोषणेचे काय झाले, असा असा प्रश्‍न आज पत्रकारांनी एन. शिवदास यांना केला असता त्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. ‘कोकणी अकादमी ही कोकणी भाषेसाठी भरीव कार्य करते. आपण राजीनामा दिल्यास काही लोक अध्यक्षपद भूषवायला टपले आहेत. अकादमीत अंतर्गत राजकारण कसे चालते ते मलाच माहीत आहे. त्यामुळे सरकार या पदावरून आपल्याला जोवर हटवणार नाही तोवर आपण राजीनामा देणार नाही’, असे ते म्हणाले.
युवावर्ग, लेखक, कलाकार आणि विशेषतः स्वातंत्र्यसैनिकांनी गोवा क्रांतिदिनाच्या सरकारी सोहळ्यावर बहिष्कार टाकून धाडसाने पोलिसी दंडेलीला तोंड दिल्याबद्दल व कोठडीही सहन केल्याबद्दल त्यांचे यावेळी भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे अभिनंदन करण्यात आले.
-------------------------------------------------------------
डॉ. माशेलकरांना अहवाल देणार
गोव्यात माध्यम प्रश्‍नावरून राज्य सरकारने गोमंतकीयांचा कसा घात केला आहे, याचा अहवाल येत्या काही दिवसांत गोवा मुक्ती सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सादर केला जाणार आहे.
--------------------------------------------------------------
भेंब्रेंकडून पुरस्कार परत
सुवर्णमहोत्सवी समितीचे सदस्यत्व सोडले

या आधीच जाहीर केल्याप्रमाणे ऍड. उदय भेंब्रे यांनी आज सरकारच्या माध्यम निर्णयाच्या निषेधार्थ गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सव समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच, त्यांनी ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ही परत केला आहे. पुरस्काराच्या रूपाने मिळालेला २५ हजार रुपयांचा धनादेश, मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व छायाचित्रही परत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, २००८ साली मिळालेला ‘शणै गोंयबाब कोकणी भाषा सेवा पुरस्कार’ही त्यांनी परत केला आहे. यात २५ हजार रुपयांचा धनादेश आणि मानचिन्हाचा समावेश आहे.
सरकारचे पुरस्कार आणि विविध सरकारी समित्यांवरून राजीनामे देणारे ऍड भेंब्रे, श्रीधर कामत बांबोळकर, दीप कारापूरकर व संजीव वेरेकर यांचे भा. भा. सु. मंचाच्या निमंत्रक शशिकला काकोडकर यांनी अभिनंदन केले. कोकणी अकादमीचे अध्यक्ष एन. शिवदास यांनी मात्र अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला.

No comments: