Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 19 June, 2011

चर्चिलला काळे बावटे

मडगावात स्वातंत्र्यसैनिकांसह ३८ जणांना अटक
मडगाव, दि. १८ (प्रतिनिधी) : मडगाव येथील लोहिया मैदानावरील क्रांतिदिनाच्या कार्यक्रमास बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव भाषण करण्यासाठी उभे राहताच भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या नेतृत्वाखालील शेकडो कार्यकर्ते, युवकयुवती, स्त्री - पुरुष यांनी हातात काळे बावटे घेऊन व निषेधाच्या घोषणा दिल्या व लोहिया मैदान दणाणून सोडले. साधारण १५ मिनिटे चर्चिलला बोलूच दिले गेले नाही. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत मंडपातील लोकांना बाहेर काढले. तेथे आणखी कार्यकर्ते सामील झाले व हातात फलक घेऊन मोठमोठ्याने सरकार व चर्चिलविरोधी घोषणा देऊन त्यांनी भाषणात व्यत्यय आणला. शेवटी पोलिसांनी स्वातंत्र्यसैनिकांसकट ३८ जणांना अटक करून पोलिस स्थानकात नेले.
आजच्या सरकारी कार्यक्रमावर स्वतंत्र गोव्याच्या इतिहासात स्वातंत्र्यसैनिकांनी प्रथमच बहिष्कार घातला होता. समारंभात स्वातंत्र्यसैनिकांच्या वतीने वामन प्रभुगावकर बोलणार होते. मात्र, त्यांनीच बहिष्कार घातल्याने बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांच्याशिवाय कोणाचीच भाषणे झाली नाहीत. व्यासपीठावर आलेक्स रेजिनाल्डो लॉरेन्स हे एकमेव आमदार उपस्थित होते तर स्वातंत्र्यसैनिकांसाठीच्या आसनांवर दुसरेच लोक विराजमान झाले होते.
मडगाव येथील कित्येक शाळांनी आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. समारंभाला लोकांची संख्या कमी होईल यासाठी चर्चिलनी रुमडामळ, दवर्ली व अन्य भागांतून बसेस भरून लोकांना आणले होते. मात्र त्यांच्यासमोर त्यांना काळे बावटे व निषेधालाच सामोरे जावे लागले. कार्यक्रम संपल्यानंतर पोलिसांनी चर्चिलना कडेकोट सुरक्षेत बाहेर काढले.
दरम्यान, लोहिया मैदानाजवळ ‘शेतकर्‍यांचो एकवट’ने शांततामय धरणे आयोजित केले होते. हातात फलक घेऊन त्यांनी भूमिपुत्राचे जीवन नष्ट करणार्‍या सरकारचा निषेध केला.
स्वातंत्र्यसैनिकांतर्फे हुतात्म्यांना पुष्पांजली
कार्यक्रम संपल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांनी येऊन हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण केली. कित्येक वर्षे स्वातंत्र्यसैनिक संघटनेतर्फे क्रांतिदिन साजरा केला जात होता. गेल्या १५ वर्षांपासून सरकारी पातळीवर हा कार्यक्रम आयोजित केला जातो. कार्यक्रमात सुरक्षा राखण्यासाठी शेकडो पोलिस शस्त्रधारी, राखीव पोलिस दल तैनात केले होते. सर्व परिसर पोलिसांनीच भरून गेला होता.
दरम्यान, अटक केलेल्या भाषाप्रेमींची ११.३० वा. पोलिसांनी सुटका केली. त्यावेळी उपस्थितांनी मोठमोठ्या घोषणा देऊन प्रवेशद्वाराशी त्यांचे फुले देऊन स्वागत केले व पोलिस स्थानक घोषणांनी दणाणून सोडले. त्यानंतर मिरवणुकीने पोलिस स्थानकाच्या लगत ते गेले व सरकारी परिपत्रकाची होळी केली. यावेळी ज्येष्ठ लेखक उदय भेंब्रे, आमदार दामू नाईक, भाषा मंचचे मडगावचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हेगडे, के. पी. आंगले, अभय खवटे, कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नाईक, शर्मद पै रायतुरकर, पूर्णानंद च्यारी, देवबाला भिसे, किरण नायक, संतोष पै रायतुरकर, युवा वर्गाच्या बरखा नाईक, भावेश जांबावलीकर, अनेक साहित्यिक, लेखक, मातृभाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रशांत नाईक म्हणाले की, आमचा लढा दीड महिन्यापासून सुरू झालेला आहे. आझाद मैदानावरील सभा, गोवा बंद करून गोमंतकीयांच्या भावना व्यक्तही केल्या गेल्या आहेत. तरीही सरकार जागे होत नसल्याने आज क्रांतिदिनाच्या वेळी मंत्र्यांना बोलू न देण्याचा पवित्रा आम्ही घेतला. या पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचेही ते म्हणाले.
उदय भेंब्रे यांनी सांगितले की, भाषाच नष्ट झाली तर संस्कृतीही नष्ट होईल. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देऊन आपल्या भाषेद्वारे संस्कृतीची मुळे पक्की होत असतात. दुर्दैवाने सरकारला ते समजत नाही. यावेळी राजेंद्र हेगडे, किरण नायक यांचीही भाषणे झाली.
निर्णय योग्यच : चर्चिल
स्वतंत्र गोव्यात पालकांनी आपल्या मुलांना कोणत्या भाषेतून शिक्षण द्यावे याचे स्वातंत्र्य मिळवून देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे व तो योग्यच आहे. प्रत्येकाने विचार करून आपापल्या मुलांना मराठी, कोकणी वा इंग्रजीमधून शिक्षण घ्यावे. पण काही लोक या पालकांच्या स्वातंत्र्याला विरोध करून दडपशाही करू पाहत आहेत. आमचे सरकार हे खपवून घेणार नाही, असा इशारा बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी गदारोळातील आपल्या भाषणात दिला.
ही दिला.

No comments: