Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 25 June, 2011

मातृभाषाप्रेमींचा दणका!

पणजीत आंदोलकांना अटक - निषेधात मुख्यमंत्र्यांना वहाणा दाखवल्या

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)
स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांनी सत्याग्रहींचा जसा धसका घेतला होता तसाच धसका आता गोव्यातील मातृभाषाप्रेमींचा विद्यमान दिगंबर कामत सरकारने घेतला आहे. आज कला अकादमी येथे आरोग्य खात्याच्या कार्यक्रमावेळी नुसती हजेरी लावलेल्या मातृभाषाप्रेमींना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक करण्यात आली. या घटनेचा निषेध म्हणून संध्याकाळी ‘एनआयओ’ येथे दिलीप सरदेसाई पुरस्कार सोहळ्यात मातृभाषा निदर्शकांनी मुख्यमंत्री व क्रीडामंत्र्यांना वहाणा दाखवून माध्यमप्रश्‍नी घेतलेल्या निर्णयाचा निषेध केला.
आज कला अकादमीत मधुमेह नोंदणी वाहनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तथा मुख्य सचिव हजर राहणार होते. सरकारी कार्यक्रम उधळून लावण्याच्या भारतीय भाषा सुरक्षा मंचाने दिलेल्या इशार्‍याच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण कला अकादमी सभागृहाला पोलिस छावणीचे रूप देण्यात आले होते. या ठिकाणी पणजी महापालिकेचे भाजप समर्थक नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते तथा भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे कार्यकर्तेही हजर होते. त्यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडला नसताना उपअधीक्षक देऊ बाणावलीकर त्यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस वाहनांत कोंबले. नगरसेवक वैदेही नाईक, शेखर डेगवेकर, शुभा धोंड, दीक्षा माईणकर, माजी महापौर अशोक नाईक, राजू सुकेरकर आदींना अटक करण्यात आली. राजदीप नाईक हे आपल्या मित्रांसोबत सभागृहात बसल्याची माहिती मिळताच त्यांना भर सभागृहातून बाहेर काढण्याचा प्रतापही पोलिसांनी केला. सभागृहाबाहेर काढले जात असताना राजदीप नाईक यांनी राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. परंतु, तरीही त्यांना ओढत नेऊन पोलिस जीपमध्ये बसवून पोलिस स्थानकात नेण्यात आले. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देऊन माध्यमप्रश्‍नी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पणजी पोलिस स्थानकावर धाव घेतली व उपस्थित आंदोलकांबरोबर पणजी पोलिस स्थानकावरच ठिय्या मांडला. पोलिस फौजफाट्यासह सरकारी कार्यक्रम करणारे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचा पर्रीकर यांनी निषेध केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना अटक करण्याच्या प्रक्रियेला त्यांनी विरोध दर्शवला व त्यांना ताबडतोब सोडले नाही तर तिथेच ठिय्या मांडण्याचा इशारा देण्यात आला. अखेर या आंदोलकांना सोडून देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्यानंतर त्यांनी सुटका करण्यात आली.
‘एनआयओ’त तारांबळ...
संध्याकाळी ४ वाजता ‘एनआयओ’ येथे क्रीडा व युवा व्यवहार खात्यातर्फे दिलीप सरदेसाई पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला मुख्यमंत्री व क्रीडामंत्री हजर राहणार होते. या सोहळ्यालाही आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पोलिसांची बरीच तारांबळ उडाली. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हे आपल्या समर्थकांसह या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी ‘एनआयओ’ सभागृहात डेरेदाखल झाल्याने सर्वांचीच पंचाईत झाली. ४ वाजता सुरू होणार्‍या कार्यक्रमाला ४.३० वाजेपर्यंत मुख्यमंत्री व क्रीडामंत्री उपस्थित राहिले नाही. यावेळी पर्रीकर यांनी दिलीप सरदेसाई पुरस्कार विजेत्या युवा जलतरणपटू तलाशा प्रभू हिला पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान केला व ते सभागृहाबाहेर पडले. लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांना अटक केल्यास अजिबात गप्प राहणार नाही, असा इशारा देऊन ते मडगाव येथे एका कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी निघून गेले. पर्रीकर गेल्याची माहिती मिळताच काही वेळाने मुख्यमंत्री व क्रीडामंत्री एकाच वाहनाने कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी उपस्थित आंदोलकांनी पायातील वहाणा दाखवून त्यांचा निषेध केला व जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दोनापावला येथील जॅक सिकेरा यांच्या पुतळ्याजवळ गार्‍हाणे घालून या कॉंग्रेस सरकारपासून गोव्याची अस्मिता वाचवण्याची हाक देण्यात आली. एकंदरीतच आज मातृभाषाप्रेमींनी पणजी व आजूबाजूचा परिसर सरकार विरोधात घोषणा देऊन दणाणून सोडला.

No comments: