Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 20 June 2011

दीपक फळदेसाईचा जामीनअर्ज फेटाळला

बाळ्ळी जळीतकांड प्रकरण


पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
जळीतकांड प्रकरणातील मुख्य संशयित दीपक फळदेसाई ‘सीआयडी’ चौकशीला सहकार्य करीत नसल्याने त्याचा जामीनअर्ज फेटाळून लावण्यात आला. तर, या प्रकरणात अटक होणार असल्याच्या भीतीने प्रशांत फळदेसाई याने अटकपूर्व जामिनासाठी मडगाव सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.
दीपक देसाई याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्याच्या कोठडीची मुदत येत्या दि. २४ जून रोजी संपत असून त्याला पुन्हा त्यादिवशी न्यायालयात हजर केले जाणार आहे. आंचल इमारतीला आग लावल्यानंतर त्याठिकाणी दगडफेक सुरू केली. त्यामुळे आतमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर निघता आले नाही. त्यात दोघांचा मृत्यू झाला, असे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. तसेच, या इमारतीला आग लावण्यास कोणाकोणाचा सहभाग होता, याचीही माहिती दीपक याने पोलिसांना दिली असल्याने सध्या पोलिस अजून पाच जणांच्या शोधात आहेत.
तर, प्रशांत फळदेसाई याचे नाव चौकशीत उघड झाल्याने त्याने आपल्याला अटक होणार असल्याच्या भीतीने न्यायालयात धाव घेतली आहे. त्याला जामीन मिळतो की त्याचा अर्ज फेटाळून लावला जातो, यावर उद्या सोमवार दि. २० जून रोजी निर्णय होणार आहे. या प्रकरणात अडकलेल्या सर्व संशयितांवर खुनाचा गुन्हा नोंद आहे. यापूर्वी प्रशांत आणि नरेंद्र याच्याविरुद्ध सीआयडीने लुक आउट नोटीस जारी केली होती. तसेच, जबानीसाठी दोनापावला येथील सीआयडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याला कोणतीही दाद अद्याप या संशयितांनी दिलेली नाही. याविषयीचा पुढील तपास महिला निरीक्षक सुनिता सावंत करीत आहेत.

No comments: