Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 20 June 2011

राष्ट्रीय निष्ठा गमावल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

नागेश करमली यांची मागणी

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
गोवा राज्यात सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि त्यांच्या कंपूने इंग्रजी या विदेशी भाषेला प्राथमिक स्तरावर लागू करून देशी भाषांचा अपमान केला आहे. राष्ट्रीय निष्ठा गमावणार्‍या या मंडळीला सत्तेवर राहण्याचा जराही अधिकार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या कंपूने विनाविलंब राजीनामा द्यावा अशी मागणी गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी केली आहे. काल पर्वरी येथील आझाद भवन सभागृहात आयोजित क्रांतिदिन सोहळ्यात श्री. करमली बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक संघ गोवाचे अध्यक्ष चंद्रकांत केंकरे, खजिनदार कांता घाटवळ, सचिव श्यामसुंदर नागवेकर व चंद्रकांत पेडणेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी आझाद भवनातील डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर आयोजित सोहळ्यात बोलताना श्री. करमली म्हणाले की, देशी भाषांचा पुरस्कार व इंग्रजी भाषेला नेहमीच विरोध करणार्‍या डॉ. लोहिया यांनी १८ जून या दिवशी गोवा मुक्तीचे रणशिंग फुकले. त्याच डॉ. लोहियांचे नाव, इंग्रजी लादणार्‍या मुख्यमंत्र्यांनी घेऊन त्या क्रांतिवीराचा अपमानच केला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच आज पणजी व मडगाव येथे जो प्रकार घडला तो पाहता मुख्यमंत्र्यांनी राजीनामाच द्यायला हवा. विद्यमान सरकारने स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना १५ ऑगस्टपर्यंत सरकारी नोकर्‍या दिल्या नाहीत तर आंदोलन करू असा इशारा श्री. करमली यांनी यावेळी दिला.
सरकारने माघार घेईपर्यंत लढा ः केंकरे
या वेळी बोलताना चंद्रकांत केकरे यांनी माध्यमप्रकरणी सरकार जोपर्यंत माघार घेत नाही तोपर्यंत स्वातंत्र्यसैनिक सच्च्या गोवेकरांच्या मदतीने आंदोलन चालूच ठेवतील व सरकारला माघार घेण्यास भाग पाडतील असे प्रतिपादन केले. मुख्यमंत्र्यांनी विनाविलंब इंग्रजी माध्यमाचा निर्णय मागे घ्यावा असे आवाहन केले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भय्या ऊर्फ विश्वास देसाई, रवींद्र शिरसाट, शशिकांत नार्वेकर, आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी स्वातंत्र्यसैनिकांना ८० व्या वर्षी आंदोलन करण्यास लावणार्‍या कामत सरकारचा निषेध करण्यात आला. श्यामसुंदर नागवेकर यांनी आभार व्यक्त केले.

No comments: