‘यूथ अगेन्स्ट करप्शन’चे उद्घाटन
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): देशात सर्वत्र भ्रष्टाचाराविरोधात व्यापक चळवळ सुरू असताना युवक या चळवळीपासून दूर राहूच शकत नाहीत. ‘यूथ अगेन्स्ट करप्शन’च्या झेंड्याखाली या युवकांनी एकत्र येण्याचे ठरवले आहे. ‘भ्रष्टाचाराविरोधात युवक’ या संघटनेच्या गोवा शाखेची आज घोषणा करून या चळवळीत झोकून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
आज येथे पत्रपरिषदेत गोवा शाखेचे निमंत्रक ऍड. प्रवीण फळदेसाई यांनी ही घोषणा केली. यावेळी सहनिमंत्रक प्रीतेश देसाई व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गोव्यातील पदाधिकारी कु. कृतिका तेंडुलकर उपस्थित होत्या. विद्यार्थी व युवकांना एकाच व्यासपीठावर आणून देश पातळीवर सुरू असलेल्या या चळवळीला बळकटी देण्याच्या उद्देशाने ही संघटना स्थापन करण्यात आल्याचे ऍड. फळदेसाई म्हणाले.
या संघटनेमार्फत विद्यार्थी व युवकांत जागृती करून त्यांना या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जातील. संघटनेतर्फे निश्चित कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. विदेशी बँकांतील काळा पैसा देशात आणण्याच्या प्रक्रियेला पाठिंबा देऊन हे धन राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी, ही प्रमुख मागणी या संघटनेची असेल. भ्रष्टाचारविरोधी कडक कायदा, काळ्या पैशांवर आवर घालण्यासाठी हजार व पाचशेच्या नोटा निकालात काढणे, पंतप्रधान, न्यायपालिका व सर्व अधिकारिणीचे सदस्य यांना लोकपाल विधेयकाच्या कक्षेत आणणे, निवडणुकीत पैशांच्या अतिरेकावर प्रतिबंध घालणे, ई-प्रशासनाला प्रोत्साहन देणे, खाजगी व बिगरसरकारी संस्थांनाही भ्रष्टाचार कायद्याअंतर्गत आणणे, शिक्षण व आरोग्य सेवेचे खाजगीकरण थांबवणे, प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना मालमत्ता जाहीर करणे बंधनकारक करणे, स्वातंत्र्यपूर्व काळातील कायदे बदलणे या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.
गोवा शाखेतर्फे स्थानिक विषयांवरही लक्ष्य केंद्रित करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. ‘उटा’तर्फे आपल्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला पूर्ण पाठिंबाही जाहीर करण्यात आला. भारतीय भाषा सुरक्षा मंचाने प्रादेशिक भाषांच्या रक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनात उतरण्याचा निश्चयही या संघटनेने केला आहे. दहावी व बारावीच्या निकालात झालेल्या घोळाची चौकशी करून जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. पर्यावरणप्रेमी व खाणविरोधी आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यांचा तपास व्हावा, बेकायदा खाणींवर बंदी आणावी व गोव्यातील ड्रग्ज व्यवहाराचे जाळे पूर्णपणे नष्ट करावे, अशा मागण्याही या संघटनेतर्फे सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. युवकांनी मोठ्या संख्येने या चळवळीत उतरून देशाप्रति आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन ऍड. फळदेसाई यांनी केले.
-------------------------------------------------------------------
हे आणीबाणीचे संकेत
देशात भ्रष्टाचाराविरोधात उभ्या ठाकलेल्या कार्यकर्त्यांना क्रूर वागणूक केंद्रातील कॉंग्रेस आघाडी सरकारकडून मिळते आहे. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम व दिग्विजयसिंग आदी नेत्यांकडून बेताल वक्तव्ये केली जात आहेत, हे आणीबाणीचेच संकेत आहेत, असे मत प्रा. दत्ता नाईक यांनी व्यक्त केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला आज ३५ वर्षे पूर्ण होत आहेत व त्यानिमित्तानेच भ्रष्टाचाराविरोधात युवक या संघटनेच्या गोवा शाखेची स्थापना करण्यात आल्याचे ते म्हणाले. आणीबाणीच्या काळात गोव्यातील ५८ जणांना अटक करण्यात आली होती. त्यात माझ्यासह अनेकांचा समावेश होता. काळा पैसा व भ्रष्टाचार याविरोधात उठलेला आवाज बंद करण्याचा घाट घातलेले हे सरकार भविष्यकाळात देशावर पुन्हा आणीबाणी लादण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही श्री. नाईक यांनी सांगितले.
Sunday, 26 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment