पणजी व मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी)
ख्रिस्ती बांधवाच्या ‘सांजाव’ या उत्सवावेळी आज राज्यातील दोन वेगवेगळ्या घटनांत दोघा तरुणांना आपला जीव गमवावा लागला. काना - बाणावली व बोरी - शिरोडा येथे या घटना घडल्या.
काना - बाणावली येथे आज दुपारी सांजावच्या धुंदीत पाण्याने भरलेल्या तळ्यात उडी टाकलेला बॅरील डिमेलो (२५) हा तरुण बुडाला. नंतर त्याला बाहेर काढून प्रथमोपचार करण्यात आले व हॉस्पिसियोत नेण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कोलवा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
दरम्यान, बोरी - शिरोडा येथे संध्याकाळी ५ वाजता सांजाव साजरा करताना तळ्यात उडी घेतलेल्या लक्ष्मीकांत बोरकर या ३० वर्षीय तरुणालाही बुडून मृत्यू आला. या घटनेनंतर त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनी फोंडा - मडगाव महामार्ग तीन तास अडवून दंगामस्ती केली. पोलिस वाहनावर बाटल्या फेकून मारल्याने तसेच बेकायदेशीररीत्या महामार्ग अडवल्याने चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. यात कॉस्तांसियो लुईस, अजय नाईक, सत्यवान नाईक व सुनील बोरकर यांचा समावेश आहे. सदर घटना येथील साई मंदिरापासून शंभर मीटरवर असलेल्या तळ्यात घडली. मृत तरुणाने मद्यप्राशन केले होते, अशी माहिती फोंडा पोलिसांनी दिली आहे. दारूच्या नशेत असलेल्या तरुणांनी नंतर दंगामस्ती करायला सुरुवात केली असेही पोलिसांनी सांगितले. अधिक तपास फोंडा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक दीपक पेडणेकर करीत आहेत.
Saturday, 25 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment