Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 22 June, 2011

वाचाळ ‘डीजीपीं’चा प्रसारमाध्यमांवर ‘नेम’

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): गोव्यात कायदा, सुव्यवस्था आणि शांती कायम ठेवण्याबाबत जे संवेदनशील नाहीत त्यांनीच आपल्या वाक्याचा विपर्यास केला असल्याचा आरोप पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्य यांनी करून थेट प्रसारमाध्यमांवरच ‘नेम’ धरला आहे. त्यांच्या या आरोपामुळे पत्रकारांंमध्ये एकच खळबळ माजली आहे. राज्यातील कोणते वर्तमानपत्र संवेदनशील नाही हे डॉ. आर्या यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी पत्रकारांकडून व्हायला लागली आहे.
दि. १८ जून रोजी एका कार्यक्रमात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नावर डॉ. आयर्र् यांनी बाळ्ळीतील आंदोलनाच्या वेळी आपण प्रत्यक्ष हजर असतो तर गोळीबार केला असता असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका व्हायला लागल्याने आपण असे म्हटलेच नव्हते, असे घूमजावही त्यांनी केले होते. दरम्यान, त्यांच्या वक्तव्यावेळचे चित्रीकरणही प्रसारमाध्यमांपाशी उपलब्ध आहे.
डीजीपींचे यशापयश...
बाळ्ळी येथील आंदोलकांवर गोळीबार केला असता, अशी वल्गना करणारे पोलिस महासंचालक गोव्यात भ्रष्टाचाराच्या आणि बेकायदा खाणींच्या विरोधात आवाज उठवणार्‍या कार्यकर्त्यांवर हल्ला करणार्‍यांना अटक करण्यास मात्र सपशेल अपयशी ठरले आहेत. कावरे खाणीच्या विरोधात आवाज उठवणारा नीलेश गावकर याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. नीलेश याची विचारपूस करण्यासाठी डॉ. आर्य स्वतः इस्पितळातही गेले होते. तसेच, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल यांनी निवेदन देऊन नीलेशच्या हल्लेखोरांनी अटक करण्याची मागणी तेव्हा केली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यानंतरही पोलिस खात्याला हल्लेखोराला पकडण्यात यश आलेले नाही.
दुसर्‍या एका घटनेत म्हापशात बसवाल्यांकडून हप्ता गोळा करणार्‍या पोलिसांचा भांडाफोड करणारा श्री. गडेकर याला पोलिसाकडूनच जबर मारहाण झाली होती. त्याचीही इस्पितळात जाऊन पोलिस महासंचालकांनी भेट घेतली होती. मात्र, याही प्रकरणात ठोस कारवाई करण्यास डॉ. आर्य यांना अपयश आले आहे.
बाळ्ळी जळीतकांड प्रकरणात पोलिस खात्याला केवळ एकाच संशयिताला अटक करण्यास यश आले आहे. या प्रकरणातील पुरावे गोळा करण्यातही अक्षम्य हलगर्जी झाल्याचा आरोप होत आहे. अशा परिस्थितीत डॉ. आर्य आपल्या वक्तव्याचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडून पळवाटा शोधायला लागले आहेत. दिल्ली येथे तंदूर खून प्रकरणाचा यशस्वी तपास करणारे डॉ. आर्य यांना गोव्यातच अपयश कसे काय येते, अशीही चर्चा सध्या सुरू झाली आहे.

No comments: