Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 19 June, 2011

एक मृतदेह सापडला

कुड्डेगाळ खाणीवर शोधमोहीम सुरू
सावर्डे व सांगे, दि. १८ (प्रतिनिधी): कुड्डेगाळ फोमेंतो खाणीवर साठवून ठेवलेला टेलिंग पॉंईटवरील मातीचा ढिगारा काल १७ रोजी रात्री ८.४५ वाजता कोसळून त्याखाली तीन व्यक्ती गाडल्या गेल्याचा व्यक्त झालेला संशय आज खरा ठरला असून या तिघांपैकी अजित नाईक या सुरक्षारक्षकाचा मृतदेह संध्याकाळी ६च्या सुमारास हाती लागला आहे. तर, अभियंता क्वाद्रुस तिपाजी व कामगार गुलाप्पा चल्मी यांचे मृतदेह शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
कुड्डेगाळ खाणीवरील टेलिंग पॉंईट कोसळल्याची वार्ता आज सकाळी सगळ्या परिसरात पसरली तेव्हा तेव्हा या खाणीवर आजूबाजूच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. मिळालेल्या माहितीनुसार, या खाणीवर सकाळी ६ ते दुपारी १.४५, २ ते रात्री ८.४५ व ९ ते सकाळी ६ अशा तीन पाळ्यांत काम सुरू आहे. सदर घटना घडली तेव्हा दुसर्‍या पाळीचे कामगार पाच मिनिटे अगोदर घरी जाण्यासाठी निघाले होते. मातीच्या ढिगार्‍यांखाली गाडले गेलेले तिघेही तिसर्‍या पाळीच्या कामावर रुजू झाले होते व अन्य कर्मचारी रुजू व्हायचे होते. तेवढ्यात ढिगारा कोसळला अशी आरडाओरड झाली व एकच हाहाकार झाला. काही क्षणातच रुजू तिघेही कर्मचारी ढिगार्‍याखाली गाडले गेले. ही दुर्घटना अर्धा तास अगोदर किंवा अर्धा तास नंतर घडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. सुमारे पन्नास कामगार काही क्षणातच मातीच्या ढिगार्‍याखाली अदृश्य झाले असते येथील कामगारांनी सांगितले.
दरम्यान, अपघातग्रस्त ठिकाणी आज दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संदीप जॅकीस, केपेचे उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस, मडगाव उपजिल्हाधिकारी आशुतोष आपटे, अधीक्षक ऍलन डीसा, उपअधीक्षक पत्रे, कुडचडे निरीक्षक भानुदास देसाई, वाहतूक निरीक्षक रमाकांत गावकर, सांगे, धारबांदोडा मामलेदार आदींनी पाहणी केली.
फोमेंतो कंपनीतील अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे एवढी मोठी दुर्घटना घडली असल्याचा आरोप किर्लपाल दाभाळ पंचायतीचे माजी पंचसदस्य सूर्यकांत गावकर यांनी केला आहे. कंपनीचे अधिकारी हा टेलिंग पॉइंट तेहतीस मीटरचा असल्याचे जरी सांगत असले तरी तो त्यापेक्षा कितीतरी उंच असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
{‘imboë¶m माहितीनुसार, गाडला गेलेला गुलाप्पा हा कामगार काही महिन्यांनीच निवृत्त होणार होता. पण त्याआधीच काळाने घाला घातल्यामुळे कामगारांमध्ये तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोक पसरला आहे. त्याची पत्नी सिद्धव्वा, मुलगे व नातेवाईक कर्नाटकहून आज सकाळी खाणीवर पोचले तेव्हा त्यांचा मोठमोठ्याने आक्रोश सुरू होता. सुरक्षारक्षक व अभियंत्याविषयी माहिती देण्यास त्यांच्या सहकार्‍यांनी नकार दिला. मातीच्या ढिगार्‍याखाली खाणीवरील फेरोमेट तसेच प्लांट पूर्ण उध्वस्त झाला आहे. पूर्वीचे कॅन्टीन तसेच छोटे वर्कशॉप गाडले गेले आहे.
----------------------------------------------------------------
बाबुर्लीवासीय भयभीत
करमणे - बाबुर्ली गावापासून तीनशे मीटर पुढे या खाणीवरील सर्वांत मोठा टेलिंग पॉंईट असल्याने कालच्या घटनेने संपूर्ण बाबुर्ली गावावर भीतीचे सावट पसरले आहे. कालची रात्र या गावातील सर्व नागरिकांनी जागूनच काढली, अशी प्रतिक्रिया तेथील महिलांनी दिली. कालचा टेलिंग पॉइंट जर बाबुर्लीवाड्याच्या बाजूने कोसळला असता तर संपूर्ण गावच या मातीच्या ढिगार्‍याखाली गाडला गेला असता, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. कुड्डो आजो या ग्रामदेवतेच्या कृपेनेच हा अनर्थ टळल्याचेही ते म्हणाले.
कुड्डो आजोची कृपा
येथे असलेले कँटीन काही दिवसांपूर्वीच दुसरीकडे स्थलांतरित केले होते. गाडल्या गेलेल्या कँटीनमध्ये १५ दिवसांपूर्वी एका सापाने आश्रय घेतला होता व तो सारखा फुत्कारत असायचा. काही दिवसांपूर्वी येथे एका कर्मचार्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या सर्व घटना म्हणजे येणार्‍या अरिष्टाच्या पूर्वसूचनाच होत्या. येथील कुड्डो आजो या जागृत दैवतानेच त्या दिल्या व मोठी प्राणहानी टळली, असे येथील कामगारांनी सांगितले.

No comments: