Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 22 June, 2011

चर्चिल, रेजिनाल्ड हाजीर हो!

अपात्रता याचिकेसंदर्भात सभापती राणेंकडून नोटीस
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेसंबंधी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना ३० जून रोजी प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस सभापती प्रतापसिंग राणे यांनी बजावली आहे.
‘सेव्ह गोवा फ्रंट’ या पक्षाच्या उमेदवारीवरून निवडून आलेले चर्चिल आलेमाव व आलेक्स रेजिनाल्ड यांनी हा पक्षच कॉंग्रेस पक्षात विलीन करण्याचा प्रकार घडला होता. दरम्यान, या पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष आंतोन गांवकर व बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी हे विलीनीकरण बेकायदा असल्याचा दावा करून या उभयतांवर अपात्रता याचिका दाखल केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने सेव्ह गोवा फ्रंट या पक्षाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करून त्यांना निवडणूक लढवण्यास मान्यता दिल्याने या विलीनीकरणाचा फुगा फुटला होता. दरम्यान, मिकी पाशेको व आलेमावबंधू यांच्यात काही काळापूर्वी झालेल्या दिलजमाईनंतर पाशेको यांनी ही याचिका मागे घेतली होती. परंतु, कालांतराने त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आल्यानंतर मिकी पाशेको यांनी नव्याने ही याचिका सुनावणीस घेण्याची विनंती करणारे पत्र १४ मे २०११ रोजी सभापती प्रतापसिंग राणे यांच्याकडे सादर केले होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांची यादी गेल्या मे महिन्यात जाहीर केली होती. या यादीत सेव्ह गोवा फ्रंट पक्षाला मान्यता देण्यात आल्याची संधी साधून मिकी पाशेको यांनी आपल्या पूर्वीच्या याचिकेची नव्याने दखल घेण्याची विनंती सभापती राणे यांच्याकडे केली होती. आता राज्यात पुढील विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असतानाच सभापती राणे यांनी ही याचिका सुनावणीस घेण्याचे ठरवले आहे. या प्रकरणी येत्या ३० जून रोजी सुनावणी घेण्याचे निश्‍चित करून चर्चिल व रेजिनाल्ड या उभयतांना प्रत्यक्ष सुनावणीस हजर राहण्यास बजावले आहे. या दोघाही नेत्यांचे भवितव्य सभापतींच्या निर्णयावर अवलंबून असल्याने या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

No comments: