मिशनरी शाळांत पालकांचा मातृभाषेसाठी आग्रह
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)
भाषा माध्यमप्रश्नी सरकारच्या आत्मघातकी निर्णयाविरोधात मातृभाषाप्रेमींनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या निर्णयाचा आधार घेऊन सरकारी प्राथमिक शाळांचे इंग्रजीकरण करण्याचा घाट घातला जात असतानाच, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इंग्रजीचा पुरस्कार करणार्या मिशनरी शाळांतील मातृभाषाप्रेमी पालकांनी मोठ्या प्रमाणात मराठी व कोकणीतून प्राथमिक शिक्षण हवे, असे अर्ज सादर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारी परिपत्रक ‘बूमरँग’ झाले असून आता या शाळांवर ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ असे म्हणण्याची वेळ ओढवली आहे.
दरम्यान, मिशनरी शाळांत मातृभाषेचा आग्रह धरणार्या पालकांवर दबाव टाकण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू झाल्याने अशा शाळांवर कारवाई करण्याची एक नवी डोकेदुखी आता शिक्षण खात्यावर ओढवली आहे.
भारतीय भाषा सुरक्षा मंचाने इंग्रजीकरणाविरोधात चालवलेल्या आंदोलनाला राज्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने प्राथमिक स्तरावर मातृभाषेच्या महत्त्वाबाबत मोठ्या प्रमाणात जागृती सुरू झाल्याने नकळतपणे इंग्रजीकडे वळणार्या पालकांचे मतपरिवर्तन होण्यास सुरुवात झाली आहे. प्राथमिक स्तरावर इंग्रजीचा एक विषय असताना संपूर्ण माध्यमाचेच इंग्रजीकरण करून संस्कृतीचाच गळा घोटण्याचा कुटील डाव व या निर्णयाचे दूरगामी परिणाम याचा उलगडा होत असल्याने पालकांच्या मनातील संशय दूर होण्यास बरीच मदत मिळत आहे.
दरम्यान, कोकणी भाषा माध्यमाच्या नावाने यापूर्वी इंग्रजीचा पुरस्कार करणार्या मिशनरी शाळांनी सरकारच्या या निर्णयाचा लाभ घेऊन संपूर्ण इंग्रजीकरणाचा डाव आखला असतानाच या शाळांतील मातृभाषेचे महत्त्व पटलेल्या पालकांनी कोकणीबरोबरच आता मराठी माध्यमासाठी अर्ज सादर करण्यास सुरुवात केल्याने या शाळांची बरीच पंचाईत झाली आहे. सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात इंग्रजीचा वर्ग सुरू करण्यासाठी किमान २० विद्यार्थ्यांची अट घातली आहे. प्राथमिक स्तरावरील सर्वच वर्गांचे इंग्रजीकरण करण्याच्या नादात असलेल्या मिशनरी शाळांत कोकणी व मराठी माध्यमाचे अर्ज सादर होऊ लागल्याने यातून कशी वाट काढावी या पेचात त्या सापडल्या आहेत.
भाषा माध्यमप्रश्नी इंग्रजी माध्यमाला मान्यता मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव घालण्यात पुढाकार घेतलेल्या मिशनरी शाळांवरच भारतीय भाषा सुरक्षा मंचाने आपला रोख ठेवला आहे. या शाळांतील पालकांची समजूत काढून व त्यांना मातृभाषेचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याकडून या शाळांत मराठी माध्यमाची मागणी करण्यास सुरुवातही झाली आहे. दरम्यान, मराठी व कोकणीची मागणी करणार्या पालकांवर त्यांच्या पाल्यांचे नाव काढून दुसरीकडे नेण्याचा दबावही घालता जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही शाळा व्यवस्थापनांकडून आपल्या मर्जीप्रमाणे पालकांनी अर्ज सादर करावे असा तगादा सुरू आहे. मातृभाषेची मागणी करणार्या पालकांवर आपल्या पाल्यांची नावे काढून टाकण्याची सक्ती करणार्या व्यवस्थापनांवर तात्काळ कारवाई केली जाईल, अशी माहिती शिक्षण खात्यातील सूत्रांनी दिली आहे. मराठी व कोकणी माध्यमासाठी सुरू असलेल्या रेट्यामुळे आता सरकारी अनुदानच नको, असे म्हणण्याची वेळ या मिशनरी शाळांवर ओढवल्याने यातून कशी सुटका करावी, अशा विवंचनेत त्या सापडल्या आहेत. या एकूण परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे मात्र शाळा व्यवस्थापनांचे दुर्लक्ष सुरू असून त्याबाबतही अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
---------------
‘‘मिशनरी शाळांत वीस पालकांनी मराठी किंवा कोकणी माध्यमासाठी अर्ज सादर केल्यास ते माध्यम त्यांना उपलब्ध करून देणे सदर शाळांना भाग आहे.’’
शिक्षण उपसंचालक
अनिल पवार
---------------
फोंड्यात शनिवारी
लेखक-कलाकार मेळावा
शैक्षणिक माध्यमप्रश्नी भारतीय भाषा सुरक्षा मंचने आखून दिलेल्या आंदोलनाचा दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी शनिवार दि. २५ रोजी संध्या. ४.३० वाजता फोंडा येथील जी. व्ही. एम.च्या आल्मेदा हायस्कूल सभागृहात अंत्रुज महालातील सर्व लेखक व कलाकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विष्णू वाघ यांनी दिली. ज्येष्ठ लेखिका माधवी देसाई यांच्यासह अनेक लेखक व कलाकार यात सहभागी होतील. अंत्रुज महालातील सर्व सर्व कवी, लेखक, पत्रकार, लोककलाकार, गायक, वादक, नाट्यकर्मी आदींनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------
श्रीमती लक्ष्मी चोडणकर
पुरस्कार परत करणार
कला व संस्कृती संचालनालयाकडून २००७ साली ‘कला गौरव’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या मुड्डीवाडा - चोडण येथील ज्येष्ठ लोककलाकार श्रीमती लक्ष्मी लिंगू चोडणकर यांनीही आपला पुरस्कार सरकारला परत करण्याची घोषणा आज केली.
--------
Thursday, 23 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment