वळवईतील शेट्ये हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना घेराव
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)
पालकांनी आपल्या पाल्यांना कोकणी व मराठीतूनच प्राथमिक शिक्षण दिले जावे म्हणून
भरून दिलेली ‘निवडपत्रे’ स्वीकारण्यास नकार देणार्या वळवईतील कृष्णा रघुनाथ शेट्ये हायस्कूलच्या मुख्याध्यापकास भाषा सुरक्षा मंच व पालकांनी घेराव घातला.
नव्या माध्यम धोरणानुसार वळवई - सावईवेरे येथील जी. व्ही. एम.च्या कृष्णा रघुनाथ शेट्ये सावईकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या बहुसंख्य पालकांनी आपल्या मुलांना कोकणी व मराठीतून शिक्षण मिळावे असे निवडपत्रात लिहून दिले. मात्र, ही निवडपत्रे शाळेचे मुख्याध्यापक वल्लभ शेट वेरेकर यांनी स्वीकारण्यास चक्क नकार दिला. आपली शाळा इंग्रजी माध्यमाची असल्याने एक तर इंग्रजी माध्यम हवे असे लिहून द्या किंवा आपल्या मुलांना घेऊन चला, अशी अरेरावीची भाषा त्यांनी करताच संतप्त झालेल्या पालकांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या कार्यकर्त्यांसह मुख्याध्यापकांना घेराव घालून याबाबत जाब विचारला.
दरम्यान, भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या युवा शाखेचे नेते राजदीप नाईक यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली असून मुख्यमंत्री जे सांगतात ते खरे असेल तर, इंग्रजी शाळांतही पालकांनी निवडलेल्या माध्यमानुसारच त्यांच्या मुलांना शिक्षण मिळायलाच हवे असे प्रतिपादन केले आहे. सदर प्रकाराविरुद्ध फोंडा पोलिस तसेच शिक्षण खात्याकडे तक्रार करण्याचेही पालकांनी ठरवले आहे.
Thursday, 23 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment