Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 21 June 2011

गुलप्पाचा मृतदेह सापडला

तिसर्‍यासाठी शोधमोहीम सुरूच
शिगाव, दि. २० (प्रतिनिधी): कुड्डेगाळ - फोमेंतो खाणीवरील टेलिंग डंप कोसळून मातीच्या ढिगार्‍याखाली गाडल्या गेलेल्या तिघांपैकी गुलप्पा चल्मी या कामगाराचा मृतदेह आज सकाळी बंकरखाली सापडला. गुलप्पा याच बंकरमध्ये अडकलेला खनिज माल साफ करण्याचे काम करत होता. सुरक्षारक्षक अजित नायक याचा मृतदेह शनिवारी संध्याकाळी सापडला होता. दरम्यान, क्वाद्रुस तिपाजी या अभियंत्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी यंत्रसामग्रीद्वारे मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरूच आहे.
आज सकाळी गुलप्पा याचा मृतदेह पोकलीनच्या साह्याने बंकर बाजूला करून काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी रीतसर पंचनामा करून सदर मृतदेह मडगावच्या हॉस्पिसियोत पाठवून दिला. आज अजित नायक व गुलप्पा यांची शवचिकित्सा पार पडली. शवचिकित्सेनंतर गुलप्पाचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांनी विजापूर येथे त्याच्या गावी नेला तर अजित याचे नातेवाईक अद्याप पोहोचले नसल्याने तो हॉस्पिसियोतच ठेवण्यात आला आहे.
मयत गुलप्पा हा गेल्या ४० वर्षांपासून फोमेंतो खाणीवर काम करत होता. काही महिन्यांनीच तो निवृत्तही होणार होता. मात्र त्याआधीच काळाने त्याच्यावर घाला घातला. मयत गुलप्पा हा सर्वांशी मिळून मिसळून वागणारा होता, असे येथील कामगारांनी सांगितले. दरम्यान, तिसर्‍या मृतदेहासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असून उद्यापर्यंत तो हाती लागेल, असा विश्‍वास शोधपथकातील अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शोधकार्याला गती मिळाली असल्याचेही ते म्हणाले.
-------------------------------------------------------------------
आता जगायचे आठवणींवरच..
पती अकाली गेल्यामुळे आता आपल्याला व आपल्या मुलांना उर्वरित आयुष्य त्यांच्या आठवणींवरच काढावे लागणार आहे. त्यांनी संसारासाठी अनेक स्वप्ने पाहिली होती. ती आता आम्हांलाच पुरी करावी लागतील. आपला पती जरी सोबत नसला तरी त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आमच्या सदैव सोबत असेल, असे गुलप्पाची शोकाकूल पत्नी सिद्धव्वा हिने सांगितले.

No comments: