अंत्यसंस्काराला तणाव; पोलिसांना पाचारण
डिचोली, दि. २४ (प्रतिनिधी)
वन - डिचोली येथील प्रमिला प्रकाश गावस (३८) या विवाहितेच्या होरपळून झालेल्या मृत्युप्रकरणी डिचोली पोलिसांनी तिचे पती प्रकाश गावस, दीर आनंद गावस, सासू आनंदी गावस व नणंद जयंती गावस यांना ३०४ कलामाखाली अटक केली आहे. दरम्यान, आज प्रमिला हिच्या अंत्यसंस्कारांवेळी बराच तणाव निर्माण झाल्याने अखेर पोलिस बंदोबस्तात, मामलेदार व उपअधीक्षकांच्या उपस्थितीत ते पार पाडण्यात आले.
काल दि. २३ रोजी सकाळी वन - डिचोली येथील घरात होरपळल्याने प्रमिला गावस हिला मृत्यू आला होता. याप्रकरणी तिचा भाऊ आत्माराम याने घातपाताचा संशय व्यक्त करून पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, पोलिसांनी वरील चौघांना ताब्यात घेतले.
दरम्यान, आज दुपारी प्रमिलाचा मृतदेह वन येथे घरी आणण्यात आल्यानंतर कुडचिरेचे नागरिक व तिच्या नातेवाइकांनी प्रकाश गावस याच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह धरल्याने तिथे बराच तणाव निर्माण झाला. अखेर डिचोली निरीक्षक हरीष मडकईकर यांनी येऊन मध्यस्थी केली. यावेळी उपअधीक्षक बॉसेट सिल्वा, मामलेदार प्रमोद भट आदी उपस्थित होते. अखेर संध्याकाळी वन येथील स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, उद्या अटक केलेल्यांना न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे. या मृत्यूमागील गूढ उकलण्याच्या प्रयत्नात डिचोली पोलिस गुंतले आहेत व सत्य लवकरच बाहेर येईल असे त्यांनी सांगितले आहे.
Saturday, 25 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment